Monday, November 15, 2021

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण

 





महामानव भारतरत्न

डॉ.बाबासाहेब

 आंबेडकर

              भारतीय घटनेचे शिल्पकार ,दलितांचे कैवारी ,दलितोद्धारक 

अशा विविध रूपांनी आपल्याला सुपरिचित असणार्‍या 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी 

आंबेडकर . 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म मध्य 

प्रदेशातील महू या गावी झाला .रत्नागिरी जिल्हयातील 

आंबवडे हे त्यांचे मूळ गाव .

                लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस असणारे त्यांचे वडील 

पुढे सातार्‍यास स्थायिक झाल्यामुळे आंबेडकरांचे बालपण 

सातारा येथे गेले .त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून 

त्यांचे कुटुंब मुंबईला  आले . इ.स.1907 मध्ये बाबासाहेब 

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले .1912 मध्ये मुंबईच्या 

एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले .

1913 साली ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना झाले .

तेथील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र ,

राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा सखोल 

अभ्यास केला . इ.स. 1915 मध्ये त्यांनी कोलंबिया

 विद्यापीठाची एम.ए.  ही पदवी प्राप्त केली .त्यानंतर

 त्याच विद्यापीठाने त्यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रबंधाबद्दल 

पी.एच.डी. ही पदवी बहाल केली .

                   अमेरिकेतील अभ्यास पूर्ण करून डॉ.आंबेडकर कायदा 

व अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले .

परंतु आर्थिक अडचणीमुळे तेथील शिक्षण अर्धवट सोडून 

त्यांना भारतात परतावे लागले . काही काळ त्यांनी बडोदा 

संस्थानात नोकरी केली . पुढे मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज 

ऑफ कॉमर्स येथे ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले .

 त्याच वेळी त्यांनी सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग घेण्यास

 सुरुवात केली . माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता 

निवारण परिषदांमध्ये ते सहभागी झाले .

                  इ.स.1920  साली डॉ.आंबेडकर पुन्हा इंग्लंडला गेले . 

तेथे त्यांनी बी.एस्सी. व  डी.एस.सी. या पदव्या संपादन

 केल्या .याच वास्तव्यात बार अॅट लॉं (बॅरिस्टर ) ची

 पदवी संपादन करून इ.स. 1923 मध्ये ते मायदेशी परतले .

मग त्यांनी आपले सार्वजनिक काम अधिक जोमाने सुरू केले .

 इ.स. 1924  मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा’ 

या संस्थेची स्थापना केली व ते समाजसुधारणेचे कार्य

 करू लागले . इ.स. 1924  मध्ये मुंबई कायदेमंडळाचे 

सदस्य म्हणून ते नियुक्त झाले . येथून त्यांच्या राजकीय

 जीवनास प्रारंभ झाला .

             डॉ.आंबेडकरांच्या काळात भारतात चातुर्वर्ण्य  , जातिभेद ,

अस्पृश्यता , सरंजामशाही या वाईट रितींचे अधिराज्य होते .

 दलित ,आदिवासी ,भटके विमुक्त हे सर्वच हालाखी ,

अन्याय ,अस्पृश्यता ,दास्य ,अज्ञान यात खितपत पडले होते .

 हा सर्व समाज जणू निश्चेष्ट लोळागोळा झाला होता .

 डॉ.आंबेडकरांनी आपल्या तेजस्वी विचारांनी या समाजाच्या 

प्राणांमध्ये फुंकर घालून चेतना आणली . अस्पृश्यांचे हक्क 

प्रस्थापित करण्याच्या प्रश्नाला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले .

              अस्पृश्यांना पाणी भरण्यास मज्जाव असणार्‍या महाडच्या 

चवदार तळ्याचे पाणी डॉ.आंबेडकरांनी 20 मार्च 1927

 रोजी महाडला सत्याग्रह करून अस्पृश्यांसाठी खुले केले .

 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिरात 

अस्पृश्यांनाही प्रवेश करता यावा म्हणून त्यांनी सत्याग्रह

 करून हिंदू मंदिरांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले केले .

अस्पृश्यांना व स्त्रीदास्य यांचा पुरस्कार करणारी मनुस्मृती 

जाळली . अस्पृश्यांनाही न्याय देण्यात यावा यासाठी

 डॉ. आंबेडकरांनी सर्वतोपरी अथक प्रयत्न केले .

 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी आपल्या 

अनुयायांसह  बौद्ध धर्माची नागपूर येथे दीक्षा घेतली .

               डॉ. आंबेडकर भारताच्या घटना समितीचे सभासद होते . 

तिच्याच मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते . भारतीय राज्यघटना

 तयार करण्यात डॉ.आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता . 

म्हणूनच भारतीय घटनेचे शिल्पकारम्हणून आपण 

त्यांना गौरवितो . 

अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कार्यावरही 

त्यांनी भर दिला . कारण शिक्षण घेतल्यानेच अस्पृश्यांची

 उन्नती होईल हे त्यांना उमजले होते . म्हणून त्यांनी तरुण 

तसेच प्रौढ दलित व्यक्तींसाठी रात्रशाळा चालविणे , वाचनलये 

सुरू करणे असे उपक्रम राबविले .

                  इ.स. 1946 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी 

ही संस्था स्थापन केली . या संस्थेने मुंबई येथे सिद्धार्थ 

कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज ही महाविद्यालये 

व इतर शैक्षणिक संस्था सुरू केल्या . दलित विद्यार्थ्यांसाठी

 अनेक वसतिगृहे चालविली . अस्पृश्यांच्या उद्धाराबरोबरच 

स्त्रीस्वातंत्र्याला प्राधान्य देऊन त्यांनी हिंदू कोड बिलाच्या 

रूपाने स्त्रीचे जीवनव्यापी गौणत्व नाहीसे करून तिला 

कायद्याने समानता मिळवून दिली .

               आपल्या दैदीप्यमान व खंबीर आचारविचारांनी दलितांच्या 

व स्त्रियांच्या जीवनात नवी पहाट , नवा प्रकाश घेऊन येणारा

 हा क्रांतिसूर्य दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी अस्तंगत झाला .

 या दिवशी वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचे महानिर्वाण झाले .

असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणार्‍या डॉ. बाबासाहेब 

आंबेडकरांना 14 एप्रिल 1990 रोजी त्यांच्या जन्मशताब्दीचे 

औचित्य साधून भारतरत्नहा सर्वोच्च सन्मान भारत 

सरकारने  मरणोत्तर प्रदान केला . अशा या महापुरुषाला 

कोटी कोटी प्रणाम !!!

 

No comments:

Post a Comment