Wednesday, November 3, 2021

छत्रपति शिवाजी महाराज

         छत्रपति शिवाजी महाराज

तिलै तैलं , गवि क्षीरं ,

काष्ठे पावकमंन्ततः

एवं धीरो विजनियाद

उपायं चास्य सिद्धये l

महाभारतामध्ये महापुरुषाचे कर्तृत्व तोलताना हा अतिशय मार्मिक सिद्धांत मांडलेला आहे .ज्याचा अर्थ आहे , तिळात तेल आहे , गाईमध्ये दुध आहे ,लाकडात अग्नी आहे .असे असले तरी एखादाच महापुरुष असा निपजतो की जो या तत्वांचा समन्वय साधून त्या वस्तूमधून तेल ,

          दूध ,  अग्नी प्राप्त करून घेतो .

          या अनुरोधाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे पाहिले तर लक्षात येते की ,   शिवरायांपूर्वी सह्याद्री    होता , त्यावरील गडकोट होते ,गनिमी काव्याचे तंत्र होते ,स्वामिनिष्ठ सैनिकही होते ,मुत्सद्दी होते . प्रकांड पंडितही होते आणि प्रामाणिक प्रजाही होती .पण या सर्वांचा समन्वय साधून कुणीही स्वराज्य स्थापन करू शकले नाही .महाराजांनी ते करून दाखविले .यातच त्यांच्या यशाचे रहस्य आहे .उण्यापुऱ्या ३० -३५ वर्षात विजापूर ,दिल्लीसारख्या पूर्वप्रस्थापित आणि बलाढ्य अशा सत्तांना आव्हान देऊन त्या खिळखिळ्या करून स्वतंत्र सार्वभौम सत्ता स्थापन केली .
                                               छत्रपती शिवाजी महाराज हे पारतंत्र्यात गांजलेल्या रयतेच्या मनात स्वातंत्र्याची, ज्योत चेतविणारे स्वातंत्र्यवीर होते ,बलाढ्य शत्रूवर सहज मात करणारे साहसी सेनानी होते औरंगजेबाच्या कराल दाढेतून सहीसलामत सुटका करून घेणारे कर्तृत्ववान होते ,तर राज्याभिषेकाचा विधी पार पाडून एतद्देशियांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाल्याची घोषणा करणारे सार्वभौम राजे होते .अशा विविध रूपातून शिवरायांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडते .

शिवकाळापासून ते आजतागायत शिवाजीया तीन अक्षरांची भारतीयांच्या मनावर भुरळ आहे .म्हणून महाराजांचे कैसे बोलणे ,महाराजांचे कैसे चालणे .... हे जाणून घेण्याची उत्सुकता आजही हजारो शिवप्रेमींच्या मनात आहे .महाराज कसे दिसत होते ,ते कसे बोलत   त्यांचा स्वभाव कसा होता ,इथपासून ते त्यांचे व्यक्तिमत्व    कसे होते , यांसारखे अनेक प्रश्न कित्येकांच्या मनात असतात .

           महाराजांचा प्रत्यक्षात संबंध हजारो लोकांशी आला .त्यापैकी मोजक्याच लोकांनी महाराजांचे दर्शन घडल्यानंतर त्यांचे वर्णन नोंदवून ठेवले आहे .ज्यात मराठी कागदपत्रांची संख्या मोजकीच आहे .  निकोलाओ मनुची हा मुळचा इटलीतील व्हेनिस शहराचा .वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इस.१६५७ मध्ये तो भारतात आला .१६६५ मध्ये तो तोफखान्याचा अधिकारी म्हणून मिर्झाराजे जयसिंगाच्या पदरी होता ...


शिवछत्रपती आणि जयसिंगाच्या भेटीदरम्यान मनुची हजर होता .त्या भेटीचे वर्णन त्याने आपल्या स्टोरीयाडी मोगोरया आत्मचरित्रात पुढीलप्रमाणे केले आहे .एके रात्री मी ,जयसिंग आणि एक ब्राम्हण छावणीत होतो .त्यावेळी शिवाजी महाराज आत आले .आम्ही उठून उभे  राहिलो . शिवरायांनी यापूर्वी मला पाहिले नव्हते .माझी नीटनेटकी अंगयष्टी पाहून ते कोणत्या देशाचे राजे आहेत ? असे त्यांनी जयसिंगास विचारले .तेव्हा जयसिंगाने सांगितले की ,

                                हे फिरंगी राजे आहेत .’    शिवरायांना आश्चर्य वाटले .ते म्हणाले ,माझ्या पदरी अनेक फिरंगी आहेत .पण ते यांच्या रुबाबाचे नाहीत .अशी ओळख झाल्यावर मला शिवरायांशी बोलण्याचे अनेक प्रसंग लाभले .

                             इ.स.१६६४ मध्ये महाराजांनी सुरतेवर स्वारी केली .त्या प्रसंगावेळी फ्रेंच प्रवासी बर्नियर म्हणतो , ‘ मी एक गोष्ट सांगण्याचे विसरलो .सुरतेच्या लुटीच्या वेळी शिवरायांनी लापुचीन मिशनरी रेव्हरंड फादर अम्ब्रोज यांच्या निवासस्थानाला टिल्ला लावला नाही .फ्रेंच पाद्री ही सज्जन माणसे आहेत ,त्यांना उपद्रव देऊ नये ,असे शिवाजी महाराज म्हणाले .याच दरम्यान काही इंग्रजांनी महाराजांना प्रत्यक्ष पाहिले .ज्यात   अंथोनी स्मिथ हाही होता .त्याने केलेले महाराजांचे वर्णन रेव्हरंड एस्कॉलिअटने दिलेले आहे .तो म्हणतो ,

महाराज मध्यम उंचीचे ,रेखीव बांध्याचे व चपळ आहेत .ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी ते स्मितहास्य करीत असल्यासारखे दिसतात .त्यांचे नेत्र विशाल ,तेजस्वी असून दृष्टी तीक्ष्ण आहे. त्यांचा वर्ण गौर  आहे .

संकर्षण सकळकळे हा शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहणारा कवी आहे .त्याने आपल्या संस्कृत कवितेत शिवरायांचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे .

      भवानीमातेचे तेज शिवभूपालाच्या देहात प्रविष्ट झाले आहे .त्यांचे नाक टोकदार असून प्रफुल्ल आहे .त्यांचे मुखकमल तांबूलाने सुगंधित आहे .तातसुवर्णासारखा त्यांचा देह सुंदर आहे .बाहू अजान आहेत .ते साक्षात बळाची मूर्ती आहेत .त्यांचे कमलनेत्र क्रोधाने आरक्त दिसतात .

                           महाराजांच्या आहारासंबंधी जे उल्लेख आढळतात त्यावरून सामान्यपणे ते मांसभक्षण करीत नसल्याचे स्पष्ट होते .आग्रा येथे कैद असताना ते रोज सकाळी सुका मेवा खात ,असे लक्षात येते. महाराजांना वीरश्रीयुक्त गाणे ,पोवाडे ,कीर्तन ऐकण्याची आवड होती .शिवाजी महाराजांना समुद्रस्नानाची आवड असल्याचे डग्लसयाने नोंदवून ठेवले आहे . अबे कॅरे ही फ्रेंच व्यक्ती इ.स १६७२ मध्ये भारतात आली होती .चौलच्या सुभेदाराने महाराजांना  जवळून पाहिले होते .तो त्यांचा अधिकारी म्हणून काम पाहत असताना अबे कॅरेची आणि त्यांची गाठभेट झाली . त्यावेळी त्या सुभेदाराने महाराजांविषयी जे उद्गार काढले ते कॅरेने नोंदवून ठेवले आहेत . महाराजांच्या या सुभेदाराने कॅरेला सांगितले की ,

    महाराजांची बुद्धिमत्ता एवढ्या श्रेष्ठ प्रतीची आहे ,की त्यांच्या बुद्धीला अनाकलनीय असे जगात काहीच नसेल  . त्यांची कर्तृत्वशक्ती तर त्यांच्या बुद्धीमत्तेपेक्षाही वरचढ आहे .ते अतुलनीय पराक्रमी योद्धे आहेत , थोर मुत्सद्दी  आहेत .  पाहिजे ती गोष्ट हाती घेऊन साध्य करून दाखविण्यात समर्थ आहेत .त्यांची महत्वाकांक्षा अमर्याद आहे .

शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला आहे .अतिशय कुशल अशा स्थापत्यविशारदापेक्षाही त्यांना किल्ले बांधणीचे अधिक ज्ञान आहे .भूगोलाचाही त्यांनी विशेष अभ्यास केला आहे . देशातील बहुतेक सर्व शहरांची ,इतकेच नव्हे तर भूप्रदेशांची आणि वनस्पतींची त्यांना माहिती आहे .त्यांनी त्यांचे नकाशेही तयार करवून घेतले आहेत . कॅरेच्या वरील नोंदीतून शिवरायांच्या व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती मिळते .शिवाजी महाराजांची राहणी अत्यंत साधी होती .स्वकीयांसोबतच परकीयांनीही महाराजांच्या अनेक गुणांचे दर्शन आपल्या लेखणीतून घडविले आहे .त्याकाळी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका व्यापक होता ,की काही काळ महाराजांच्या लाभलेल्या सहवासाचेही कौतुक वाटे .

              हेन्री ऑक्झेडेन आपल्या डायरीत लिहितो , “ २५ मार्च १६७५ रोजी शिवाजी महाराजांच्या बोलावण्यावरून मी त्यांना भेटण्यास गेलो .मी त्यांच्या उजवीकडे इतक्या जवळ बसलो होतो की, मी त्यांना स्पर्श करू शकलो असतो .” थोडक्यात , महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण शिवकालापासून आजतागायत अनेकांना वाटत आले आहे .

 


 

 


 

 



No comments:

Post a Comment