Wednesday, November 3, 2021

Pandit Jawaharlal Nehru पंडित जवाहरलाल नेहरू जीवनपट

 पंडित जवाहरलाल नेहरू जीवनपट




पंडित जवाहरलाल नेहरू जीवनपट

आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यांसाठीही प्रकाशवाटा निर्माण करणारी काही  माणसे भारतभूमीवर जन्माला आली . अचल ध्येयवाद आणि दीर्घ कर्मवादाने भारावलेले असामान्य माणसांचे जीवन आपल्यासाठी आदर्शवत   असते . 

                  थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला . वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरुपाराणी .जवाहरलालांचे वडील त्या काळातील सर्वात प्रथितयश वकील होते .

                  फुलांची आवड व मुलांवर प्रेम करणारे चाचा नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिनम्हणून साजरा करतो .

सन १९१९  मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. सन १९२० नंतर सुरु झालेल्या गांधीयुगात त्यांनी गांधीजींचे सच्चे व एकनिष्ठ अनुयायी म्हणून कामगिरी बजावली .गांधीजीनी १९२० नंतर स्वातंत्र्यासाठी सुरु केलेल्या विविध चळवळींमध्ये जवाहरलालजी आघाडीवर होते .भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य नको तर संपूर्ण स्वातंत्र्य हवे ,या विचारांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला .

सन १९२९ च्या लाहोर येथे झालेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले .याच अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठरावसंमत करण्यात आला .सन १९३६ व १९३७ या दोन वर्षी ते लागोपाठ राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते .त्यानंतर १९५१ ,१९५३ व १९५४ मध्येही त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष होण्याचा बहुमान पुन्हा लाभला .

                  सन १९४२ च्या आंदोलनात त्यांनी तीन वर्षे कारावास भोगला .त्यांच्या सुटकेनंतर ब्रिटीशांबरोबर स्वातंत्र्याच्या वाटाघाटी करणाऱ्या मान्यवरांमध्ये त्यांचे स्थान अतिशय महत्वाचे होते .या वाटाघाटींमध्ये त्यांचा प्रमुख वाटा होता .सन १९४६ मध्ये लॉर्ड वेव्हेल यांनी त्यांच्याकडे अंतरिम शासनाच्या प्रमुख पदाची सूत्रे सोपवली .

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला . परराष्ट्रीय संबंधात त्यांनी अलिप्ततेच्या धोरणाचा व पंचशील तत्वांचा स्वीकार केला .

                  सन १९५० मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मंडळाची स्थापना झाली .पहिली व दुसरी पंचवार्षिक योजना त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाली ,तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची पहिली तीन वर्षेही त्यांच्या कारकिर्दीत पार पडली .या योजना बहुतांशी यशस्वी होण्यात त्यांचे प्रयत्न मोठया प्रमाणात कारणीभूत ठरले .

संस्थानांचे विलीनीकरण ,१९४८ मधील पाकिस्तानचे काश्मीरवरील आक्रमण ,१९४७-४८ च्या जातीय दंगली ,१९६१ मधील गोव्यातील लष्करी कारवाई व गोव्याचे भारतात सामिलीकरण , १९६२ मधील चीनचे आक्रमण या समस्यांना त्यांनी खंबीरपणे तोंड दिले .

14 नोव्हेंबर -बालदिन विशेष माहितीपट -पंडित जवाहरलाल नेहरू जीवनपट 

- ग्रंथसंपदा 

     डिस्कव्हरी ऑफ इंडियाग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरीहे त्यांचे ग्रंथ सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्याच नव्हे तर वाड्मयीनदृष्ट्याही महनीय आहेत .हे ग्रंथ वाचताना या थोर राजकारण्याच्या अंतःकरणात दडलेला अभिजात व अभिरुचीसंपन्न साहित्यिक व कोमल हृदयाचा कवी आपणास ठायीठायी जाणवतो  व भावतोही . डिस्कव्हरी ऑफ इंडियाहा ग्रंथ त्यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला .

                  -अलीप्ततेचे धोरण

नेहरूंचा आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन उदार ,मानवतावादी व नीतीमूल्यांची जपणूक करणारा होता .आंतरराष्ट्रीय पातळीवर सहिष्णुता ,सामंजस्य व परस्परसहकार्य वाढीस लागावे असे त्यांना वाटे .त्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते .या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच त्यांनी स्वतंत्र भारताच्या ...

परराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततावादाचा पुरस्कार केला .अमेरिका ,रशिया व इतर कोणत्याही राष्ट्रगटात सामील न होता अथवा राष्ट्रास कोणत्याही लष्करी कराराने बांधून न घेता त्यांनी अलीप्ततेचे धोरण स्वीकारले व राष्ट्राची स्वतंत्र विचारसरणी जतन केली .

अलिप्ततावादामुळे भारतास वेगवेगळ्या राष्ट्रगटांशी  सहकार्याचे संबंध ठेवता आले व विकासकार्याच्या दृष्टीने मदत मिळवता आली .या अलिप्ततेच्या धोरणामुळे त्यांनी राष्ट्रास नैतिक व राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली .

                  -पंचशील तत्वे

आंतरराष्ट्रीय राजकारणात परस्पर सामंजस्य ,सहकार्य व सहिष्णुता वाढावी या तळमळीतूनच पंचशील तत्वांचा जन्म झाला .या पंचशील तत्वांच्या आधारावरच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात परस्पर सामंजस्य वाढीस लागेल व शांततामय सहजीवनाचे उद्दिष्ट साध्य होईल ,शी नेहरूंची धारणा होती .

सन १९५४ मध्ये झालेल्या भारत चीन करारात या पंचशील तत्वांचा पहिल्यांदाच पुरस्कार करण्यात आला .सन १९५५ मध्ये झालेल्या आफ्रो- आशियायी राष्ट्रांच्या बांडुंग येथील परिषदेच्या जाहीरनाम्यावर पंडित नेहरूंनी पुरुस्कृत केलेल्या या पंचशील तत्वांचाच प्रभाव पडलेला आढळतो .

                  -पंचशील तत्वे

ही पंचशील तत्वे पुढीलप्रमाणे

1-शांततामय सहजीवन व आर्थिक सहकार्य .

२-परस्परांविषयी आदरभाव .

३-परस्परांविरुद्ध आक्रमण न करणे .

४-परस्परांविरुद्ध सार्वभौमत्वाविषयी आदर बाळगणे .

५-इतर राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करणे .

पंडित नेहरूंनी या पंचशील तत्वांचा आयुष्यभर सतत पुरस्कार केला .

अशा या महान व्यक्तीचा मृत्यू २७ मे ,१९६४ रोजी त्रिमूर्ती भवन ,दिल्ली येथे झाला.


 

No comments:

Post a Comment