Wednesday, November 3, 2021

मराठी राजभाषा दिवस

 









                         मराठी राजभाषा दिवस 

माझ्या मराठीची गोडी,

माझ्या मराठीची गोडी ,मला वाटते अवीट,

माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवीत

ज्ञानोबांची ,तुकयाची ,मुक्तेशाची ,जनाईची

माझ्या मराठीची गोडी, रामदास शिवाजींची

डफ तुणतुणे बोलते ,उभी शाहीर मंडळी

मुजऱ्याची मानकरी ,वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ ,अभंगाच्या तालावर

कोवळीक विसावली, पहाटेच्या जात्यावर

माझ्या मराठीची थोरी ,नित्य नवे रूप दावी

अवनत होई माथा ,मुखी उमटते ओवी

                         

                    आईच्या बोलण्याला बोबड्या बोलांनी प्रतिसाद देतांना आईची ही बोली कधी आपली बोली होते , हे कळतच नाही .आपल्याला कळायच्या अगोदरच आपण मराठी होतो आणि नंतर जन्मभर कुठेही गेलो तरी संस्कृतीचा हा वारसा टिकवून धरतो .आंतरजालात जगभर पसरलेल्या मायबोलीच्या पाउलखुणा एकत्र करण्याचा हा छोटासा प्रयत्न .

       वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून , मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत .आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारीहा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा केला जातो.

माझ्या मराठीचा बोल कवतुके

परि अमृताचेनि पैजा जिंके

अशा शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे महत्व विशद केले आहे .संत एकनाथ महाराज मराठी भाषेचा स्वाभिमान विशद करताना जणू सरळ सरळ प्रश्नच विचारतात ,

 

संस्कृत वाणी देवे केली । मराठी काय चोरापासून आली ।।

           मराठी ही आमची मातृभाषा आहे .ती आमची हृदयाची भाषा आहे आणि म्हणूनच ती आम्हाला माता ,मातृभूमी इतकीच प्रिय आहे . संत ज्ञानेश्वरांच्या लेखनाची प्राकृत भाषा म्हणजे मराठीची पूर्वावस्थाच म्हणता येईल .संत ज्ञानेश्वर ,संत चक्रधर यासारख्या संतांनी मराठीला महत्व प्राप्त करून दिले आहे .संस्कृतमधील ज्ञान मराठीत आले .मराठी हे ज्ञानाचे माध्यम बनले .

           तेव्हा मराठी माणसाच्या मनात आपल्या या मायबोलीबद्दल अभिमान व आदर वाटू लागला . भारतावर इंग्रजांनी राज्य केले तेव्हापासून महाराष्ट्रावरदेखील इंग्रजी भाषेचा परिणाम आपले अस्तित्व टिकवून आहे .

          सध्या एकविसाव्या शतकात इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे .इंग्रजी अवगत असणे गरजेचे आहे परंतु इंग्रजी आली मग आता मराठी काही गरजेची नाही असे म्हणून चालणार नाही .कारण मराठी ही आमची मायबोली आहे .

      जागतिकीकरण या शब्दाने साऱ्या जगावर जादू केली आणि सारं जग प्रचंड वेगानं धावू लागलं .या वेगात आभाळ कवेत घेण्यासाठी हात उंच केलेला माणूस पायाखालच्या मातीला विसरू लागला .मायबोलीच्या बाबतीतही हे घडू लागले .इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलाचे आईवडील घरातसुद्धा आपल्या मुलाशी इंग्रजी भाषेत बोलू लागले आहेत .परिणामी छान छान गोष्टीमधल्या मराठी भाषेतील कथा आउटडेटेड वाटायला लागल्या .झटपट इंग्रजी बोलाया पाट्या गावागावापर्यंत पोहचल्या .इंग्रजी ही जगाची भाषा आहे याबद्दल शंकाच नाही परंतु इंग्रजी किंवा परकीय भाषा आपलीशी करत असताना मराठीबद्दल हीनतेची भावना जर निर्माण होत असेल तर ते उचित नाही .

       आपला प्रदेश, त्या प्रदेशाचा इतिहास,तेथील समाज ,संस्कृती ,साहित्य ,परंपरा ,वारसा हे सारं समजावून घेण्यासाठी मातृभाषेचाच आधार घ्यावा लागतो .त्यासाठी मातृभाषेबद्दल आवड व आदर असला पाहिजे .वाढत्या स्पर्धेबरोबर धावताना मराठीबद्दलच्या संकुचित भावनेतून मातृभूमीविषयीच्या अस्मिता व समाजनिष्ठा गोठल्या जाऊ नयेत असेच मनोमन वाटते .

           त्यासाठी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून फिरणाऱ्या माणसापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसाच्या मनात आपल्या मायबोलीबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे .

अखिल विश्व मराठी साहित्य संमेलनासारखेनवीन उपक्रम निश्चितच यासाठी प्रेरणास्रोत ठरतील अशी अपेक्षा आहे .  शेवटी कवी सुरेश भट्टयांच्या शब्दात एवढेच म्हणेन ....

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।

 

 


No comments:

Post a Comment