Friday, November 5, 2021

डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम जीवनपरिचय

 






भारताचे माजी राष्ट्रपती व  मिसाईल मॅन

डॉ.ए.पी.जे.

अब्दुल कलाम

                                           आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यांसाठीही प्रकाशवाटा निर्माण करणारी काही  माणसे भारतभूमीवर जन्माला आली .अचल ध्येयवाद आणि दीर्घ कर्मवादाने भारावलेले असामान्य माणसांचे जीवन आपल्यासाठी आदर्शवत असते. साऱ्या भारत देशातील विद्यार्थी व युवकांसाठी आदर्शाचा दीपस्तंभ ठरावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होय .

                                    डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे एका गरीब मुस्लीम कुटुंबात झाला . त्यांचे पूर्ण नाव डॉ .अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते .वडिलांचा साध्या बोटी बनवण्याचा व्यवसाय होता व भावाचे पानाचे दुकान होते .त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती.आपला मुलगा शिकून मोठा व्हावा ही प्रबळ इच्छा त्यांच्या वडिलांची होती .

                                                         लहानपणापासून कलाम अभ्यासात प्रचंड हुशार होते .गणित आणि विज्ञानाची त्यांना प्रचंड आवड होती . कलामांनी जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण चालू ठेवले .प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मद्रास इंस्टीट्यूट सेन्ट जोसेफ कॉलेज तीरुचीरापल्ली या ठिकाणी झाले .त्यांनी १९५८ ते १९६३ या कालखंडामध्ये राष्ट्रीय संरक्षण संस्था या ठिकाणी काम केले . शालेय जीवनामध्ये कलामांनी वर्तमानपत्रे विकली .आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमवा आणि शिका या मार्गांचा स्वीकार केला .

                                       संरक्षण संशोधन क्षेत्रातून १९५८ साली डीआरडीओया संस्थेतून कलामांनी आपल्या कार्याची सुरुवात केली .त्यानंतर इस्रोसंस्थेतून अंतराळ संशोधन कार्य सुरु केले .१९८२ मध्ये पुन्हा ‘डीआरडीओ मध्ये दाखल होऊन क्षेपणास्त्र विकासाचा नियोजीत कार्यक्रम तयार केला . त्यांच्या या अथक परिश्रमातून पृथ्वी ,नाग ,आकाश ,त्रिशूल ,  अग्नी इ . प्रक्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात भारताला यश आले .

                                    अमेरिकेने तंत्रज्ञान देणे नाकारल्यावर कलामांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी प्रक्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी अविरत प्रयत्न केले .संरक्षण साधनांच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी हा संशोधक अविरतपणे झटला . स्वदेशातच शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाच्या उपयोगाने देशाला स्वावलंबी बनवणारा हा संशोधक यात्री परदेशातच शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होणाऱ्या आजच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचा दीपस्तंभच आहे .प्रचंड एकाग्रता ,विनयशीलता ,स्वदेशप्रेम ,साधेपणा ,शांत व नम्र स्वभाव ,कामातील सातत्य ,अचल ध्येयनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष सांगता येतील .

                                     संशोधन काळात दिल्लीमध्ये राहायला मोठे निवास मिळत असताना देखील कलामांनी सरकारी गेस्ट हाउसमध्ये राहणेच पसंत केले .हाच शास्त्रज्ञ भारताच्या संरक्षण खात्याचा सल्लागार व त्यानंतर भारताचा राष्ट्रपतीसुद्धा झाला .त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या काळात आपला देश २०२० सालापर्यंत महासत्ता होईल असा आशावाद प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये निर्माण केला .अनेक नामांकित विद्यापीठांकडून सन्मानाच्या पदव्या अवार्ड्स कलामांना देण्यात आले आहेत .

व्हिडिओ  पाहण्यासाठी   येथे क्लिक करा.

                                              तसेच भारत सरकारकडून पद्मविभूषणभारतरत्न हा  सर्वोच्च सन्मानही त्यांना बहाल करण्यात आला .परंतु या साऱ्या यशाचे श्रेय डॉ .कलाम स्वतःकडे न घेता संशोधनात मदत करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना देऊन टाकतात .त्यांच्या या मनाच्या मोठेपणातून एकीतून प्रगतीकडे जाण्याचा आणि संघटनात्मक मार्गाने राष्ट्रविकास साधण्याचा आदर्श साऱ्या भारतवासियांपुढे उभा राहतो .

                                                राष्ट्रपती पदाचा कालखंड पूर्ण झाल्यावर केवळ दोन सुटकेस हातात घेऊन राष्ट्रपती भवन सोडणारा हा राष्ट्रपती साऱ्या देशवासियांना जणू आदर्श निष्काम कर्मयोगीच भासला होता.युवकांनी मोठी स्वप्ने पहावीत .त्याप्रमाणे विचार करावा व विचारांना कृतीत आणावे .आपली राष्ट्रीय दृष्टी हेच आपले जीवनकार्य आहे असे समजून कार्य करावे ,हा डॉ .कलामांचा संदेश भारतीय तरुणांनी शिरोधार्थ मानून आपले आचरण करावे व २०२० साली भारताला महासत्ता बनविण्याचे सत्यात आणावे   .

डॉ .अब्दुल कलामांचे विचार

                      युवकांना मार्गदर्शन करताना ते सांगत ...

देशाची प्रगती युवा शक्तीच्या कर्तृत्वाने घडत असते .तुमचे हात देशाच्या विकासासाठी व विकसित राष्ट्र बनविण्यासाठी झटले पाहिजेत .प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करावी .

अशी माणसे जेव्हा देशाच्या मातीत निर्माण होतात ,तेव्हाच पाय जमिनीवर ठेवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या पिढ्या निर्माण होत असतात .तेव्हाच देशाचा विकास होत असतो .

अशा या महान कर्मयोगी शास्त्रज्ञाचा मृत्यू २७ जुलै २०१५ रोजी झाला

डॉ .अब्दुल कलामांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करावा , एवढीच सार्थ अपेक्षा व्यक्त करतो .

जय हिन्द !


 


No comments:

Post a Comment