अध्यक्ष महाशय, गुरुजनवर्ग उपस्थित प्रेक्षक आणि मित्रानो, प्रथम मायभूमीला परकीय सत्तेच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या, या भूमीवर रक्ताचा अभिषेक करून तिला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या त्या शूरवीर क्रांतिकारकांना प्रथम वंदन करतो. आज मी अशाच एका क्रांतिकारकाविषयी बोलणार आहे. 'भारतीय क्रांतिकारकांचे मेरूमणी' अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जातो, त्या थोर क्रांतिकारकाचे नाव आहे पंजाबचे क्रांतिसिंह शहीद भगतसिंग.
.
१९२८ मध्ये भारताला काही सुधार देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवले; पण या कमिशनचे सातही सदस्य इंग्रज होते. इंग्रजांना भारतीय जनतेच्या समस्या काय माहीत? भारतीय नेत्यांपैकी एकालाही त्यात न घेतल्याबद्दल सायमन कमिशनला भारतातून विरोध झाला, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासाठी सर्व नेते सज्ज झाले.
लाहोर शहरात याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. या मोचार्च नेतृत्त्व होते लाला लजपतराय या वयोवृद्ध नेत्याकडे. सर्वांचे आवडते नेते मोठ्या हिमतीने इंग्रजांचा निषेध करत होते; पण उर्मट इंग्रजांनी हे आंदोलन चिरडून टाकत लाठीहल्ला सुरू केला. यात लालाजी जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला.
क्रांतिकारकांची माथी भडकली. इंग्रजाविरुद्ध क्रांतिज्योत पुन्हा भडकली.
संबंध भारत देशात हाहाकार माजला होता. इंग्रजांच्या मनमानी वागण्याला भारतीय जनता त्रासली होती. अन्याय, अत्याचाराने जनता भयभीत झाली होती. इंग्रजांच्या जुलूम शाहीचा आता अहिंसेच्या नव्हे, तर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने नायनाट करायला हवा, असा ठाम निर्णय घेण्याची वेळ आली होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच भगतसिंगांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने 'नौजवान भारत सभा' स्थापन केली.अनेक मित्रांना स्वातंत्र्यांचे महत्त्व पटवून देत या नौजवान संघटनेत सामील करून घेतले. त्यांच्या संघटनेच्या 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' या घोषणेने आसंमत हादरून जायचा. क्रांतीची ठिणगी पडू लागली होती. भारतीय मने स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटली. जीवाचे रान करून प्राण तळहातावर घेऊन जुलमी इंग्रजांविरुद्ध उघडपणे सशस्त्र क्रांती करण्यास तयार झाली होती.
लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घ्यायचा, अशा निश्चय भगतसिंगांनी केला. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांनी एक योजना आखून ज्या इंग्रज अधिकाऱ्याने लाठीहल्ला करवून लालाजींचा खून केला, त्या इंग्रज अधिकाऱ्याचा शेवट करायचा निर्णय घेतला आणि ठरलेल्या योजनेप्रमाणे १७ डिसेंबर, १९२८ रोजी पिस्तुलाचा ठो ठो आवाज झाला आणि मोटारीतून चाललेल्या सँडर्स या इंग्रजी अधिकाऱ्याचा नायनाट झाला. ब्रिटिश सरकार हादरले. पळून गेलेल्या मारेकऱ्यांना म्हणजेच भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर यांचा शोध सुरू झाला. क्रांतिकारक वेषांतर करून राहू लागले.
८ एप्रिल, १९२९ रोजी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये 'पब्लिक 'सेफ्टी' बिलावर चर्चा चालू होती. ही बिले म्हणजे कामगारवर्ग आणि सामान्य जनता यांच्यावर मर्यादा घालणारी होती. क्रांतिकारकांना हे पटले नाही. भगतसिंग यांनी या गोष्टीचा निषेध करायचा निर्णय घेतला; पण तो क्रांतीच्या मार्गाने.
भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात प्रवेश करून बॉम्बस्फोट घडवून आणला व स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होत आपल्या करारी आवाजात त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले, की बहिऱ्यांना ऐकू यावे, यासाठी आम्ही आवाजाचा धमाका केला. सरकारने हिंदी जनतेवर चालवलेली जुलूमजबरदस्ती आणि निरपराध लोकांची हत्या व लाला लजपतराय यांची हत्या या साऱ्या गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत, तोही आमच्या मार्गाने! " माणसे मारणे हा आमचा उद्देश नाही; परंतु आमच्या मातृभूमीसाठी हे आम्हाला करणे भाग पडले." असे उद्गार काढताच 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, सुखदेव, राजगुरू या सर्व क्रांतिकारकांनी तुरुंगात डांबून इंग्रजांनी त्यांच्यावर गुप्तपणे खटला सुरू केला. इकडे भारतीय जनतेत हे क्रांतिकारक मानाचे स्थान म्हणून भारतीयांच्या मनात बसले होते.
क्रांतिकारकांची वाढती लोकप्रियता पाहून इंग्रजांनी सर्व नियम धाब्यावर बसवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली.
२३ मार्च, १९३१ रोजी या तिघांनाही फाशी देण्यात आली. मातृभूमीला अखेरचा सलाम करून तिचा निरोप घेतला. 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' असे म्हणत त्यांनी मृत्यूला मिठी मारली.
हसत हसत मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या या थोर क्रांतिकारकांना माझा सलाम ! मित्रहो, एवढं बोलून माझे भाषण थांबवतो.
जय हिंद, जय भारत ! इन्किलाब जिंदाबाद !