महात्मा गांधी
ज्यांनी जगाला आणि राष्ट्राला शांततेचा संदेश दिला.आपल्या कृतीतून व विचारातून सत्याचा मार्ग दाखवला,सत्यातून परिवर्तन होऊ शकतं व देश स्वातंत्र्य होऊ शकतो हे ज्यांनी जगाला दाखवून दिलं त्या महात्मा गांधींच्यावरती बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे.
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी.
गांधीजींचा जन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरातमध्ये
पोरबंदर या ठिकाणी झाला .सधन कुटुंबात जन्माला आलेले गांधीजी दहावीच्या
शिक्षणानंतर विदेशामध्ये विलायतीला शिक्षणासाठी निघून गेले.प्रचंड अभ्यास व
आत्मविश्वासाच्या बळावरती बापुजींनी बरीस्टर ही पदवी संपादन केली.पाश्चिमात्य
राष्ट्रात ज्यावेळी बापुजी गेले,त्यावेळी
बापूजीना असमतोल पहावयास मिळाला.गांधीजी ज्यावेळी आफ्रिकेत होते त्यावेळी काळे
गोरे या भेदभावाला बापूजींना सामोरेजावे लागले,त्याचवेळी
बापूजींच्या हळव्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला.ज्या ठिकाणी मनुष्याला
पशुसारखी वागणूक मिळत असेल तर त्या ठिकाणी इतरांचे जीवन कसे असेल हा प्रश्न
बापूजींच्या समोर उभा राहिला.त्याचवेळी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये परिवर्तनाच्या
लढाईस सुरुवात केली.
काही कालखंडानंतर बापूजी भारतामध्ये आल्यानंतर एका नवीन लढ्याला
सुरुवात करावी अशीच मानसिकता बापूजींच्या मनामध्ये निर्माण झाली .तेव्हाच
बापूजींनी परकीय सत्तेविरुद्ध संयम, त्याग ,शांतता यांच्या माध्यमातून एका नव्या लढाईस सुरुवात केली.बापूजींनी १९२०
च्या कालखंडामध्ये असहकार चळवळीची सुरुवात केली.या देशातल्या सामन्यातला सामान्य
जनतेला ब्रिटिश या देशाचे प्रशासक नसून ते या जनतेचे शोषक आहेत.व्यापारी म्हणून
आलेले इंग्रज या देशाचे राज्यकर्ते बनले आहेत.हे इथल्या भारतीयांना पटवून देण्याचा
प्रयत्न केला.
'दे दी हमें आजादी
बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत
तुने कर दिया कमाल '
१८ व्या शतकाच्या अखेरीस आपला देश ब्रिटीशांच्या विरुद्ध पेटून उठला होता.सगळीकडे आंदोलने,मोर्चे ,खून जाळपोळ लाठीमार यांचे वातावरण होते.अशा परिस्थितीमध्ये एक अद्वितीय व्यक्तिमत्व उदयाला येत होते ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके राष्ट्रपिता 'महात्मा गांधी'.
एकीकडे इंग्रजांच्या अत्याचारामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती ,तर दुसरीकडे गांधीजींच्या सत्य,अहिंसा ,दया ,प्रेम,करूणा यांसारख्या तत्वांनी लोकांना दिलासा मिळत होता .अहिंसेच्या मार्गाने चाललेली 'चले जाव 'चळवळ तसेच असहकार चळवळ यांमुळेच ब्रिटिशांना आपला देश सोडून जाने भाग पडले आणि आपला देश स्वतंत्र होऊ शकला.
या स्वातंत्र्यलढयाबरोबरच त्यांचे अन्य जीवनकार्यही आदरणीय असेच आहे.ते एक थोर समाजसेवक होते .त्यांना भारतात केवळ स्वराज्य नको होते तर त्यांना 'सुराज्य' प्रस्थापित करावयाचे होते .त्यासाठी ते आयुष्यभर स्वतः झटले .तळागाळातल्या ,गोरगरीब ,अस्पृश्य,उपेक्षित अशा अनेकांचा त्यांनी उद्धार केला.त्यांचे दुःख ,पिडा पाहून ते रात्रंदिवस तळमळत असत.या देशातल्या गरीब लोकांना जर पुरेसे अन्न,वस्त्र ,निवारा अशा मुलभूत सुविधाही मिळत नसतील तर आपण सुखसुविधा का घ्यायच्या ? या विचाराने ते झपाटून गेले आणि मग 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हे त्यांचे तत्वच बनले.
शहराकडे जाणारा वाढता ओघ पाहून त्यांनी 'खेड्याकडे चला ' हा संदेश दिला .तर स्वच्छता ,आरोग्य आणि श्रमाचे महत्व स्वतःच्या कृतीतून पटवून दिले.हरिजनांना त्यांनी स्वतः जवळ केले.स्त्री-शिक्षण ,ग्रामोद्धार याला प्राधान्य दिले .त्यांचे हे अलौकिक कार्य देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले.अनेक ज्येष्ठ -श्रेष्ठ व्यक्ती त्यांचे अनुयायी बनले.हळूहळू त्यांची कीर्ती साऱ्या विश्वात पोहोचली.सत्य,अहिंसा ,सहिष्णुता आणि सहकार ही त्यांची चतुःसूत्री साऱ्या जगाने मान्य केली.
आपल्या समाजाला प्रगतीच्या वाटेने पुढे नेतो तो नेता . या थोर नेत्याने सर्व देशवासियांना आपलेसे केले.लोक त्यांना 'बापू' म्हणत . साऱ्या जगासाठी ते 'महात्मा' झाले आणि एखाद्या पित्याप्रमाणे ते देशासाठी झटले.म्हणून ते 'राष्ट्रपिता महात्मा गांधी 'झाले.
हल्लीच्या युगात स्वार्थासाठी ,सत्तेसाठी लढणाऱ्या नेत्यांना पहिले की, मन उद्विग्न होते .महात्मा गांधीजींच्या अंगी असणाऱ्या अनेक गुणांपैकी थोडे जरी गुण या नेत्यांनी आत्मसात केले तर किती छान होईल बरे ! एक आदर्श व्यक्तिमत्व ,एक थोर नेता म्हणून ते नेहमीच वंदनीय आहेत .कारण ...
'दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती '
No comments:
Post a Comment