Wednesday, September 21, 2022

कथा - शंभराची नोट

p> 

        कथा - शंभराची नोट

       एक हृदयद्रावक कथा 


         लेकानं दिलेली शंभराची नोट त्यानं मा खिशात ठेवली. झटपट काम संपवून तो बाहेर पडला. वेगात त्याची पावलं घराच्या दिशेनं ओढीनं निघाली. आता सण झोकात साजरा करायचे इमले तो मनात बांधू लागला. गेल्या कित्येक दिवसांत घरात काही गोडधोड शिजलेलं नव्हतं. पोरगं किती तरी दिवसापासनं खीर खायला मागतंय. आज पहिलं खिरीचं साहित्य आणायचं. बायकोची चमचमीत खायची इच्छा कित्येक दिवसांपासून आहे; पण जमलंच नव्हतं. आज ती जाम खूश होईल. मालकिणीनं दिलेली चोळी आणि पातळ जरा शिवून घेईल. यातलेच चार पैसे बाजुला ठेवतो म्हणजे आणखी चार दिवस तरी ताटात कसली ना कसली भाजी दिसेल. बटाट्याची रसभाजी खाऊन किती दिवस झाले? बाप रे, आठवतपण नाही. एक लॉटरीचं तिकीट काढू, बघू काय नशीब फळफळलं तर. चार वर्षांपूर्वी दिवाळीत घेतलेला सदराच जरा शिवून घेतो. तोच घालता येईल. लेकाला जुन्या बाजारातनं एखादा शर्ट मिळतोय का बघू. तो धुऊन घातला तर नवा शर्ट मिळाला म्हणून लेकरू खूश होईल. पोराटोरांत जरा मिरवून येईल. बरेच दिवस झाले नाक्यावरच्या गणपतीपुढं नारळ फोडलेला नाही. उद्या सण म्हणून नक्की फोडू. देव दयाळू असतो म्हणतात. या नारळाला जागून जरा त्रास तरी कमी होईल. चप्पल तुटली म्हणून पंधरा दिवस झालं घातलेली नाही, ती आधी दुरुस्त करून घेतो. पावण्या-रावळ्यात जायचं म्हटलं, की पायात काय नसलं की लाजल्यासारखं होतंय...


.त्याची विचारांची गाडी अगदी सुसाट सुटलेली. घराचं स्टेशन आलं आणि गच्चकन ब्रेक लावून गाडी थांबली. तो घरात शिरला..


नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हसू बघून तिनं ताडलंच, आज काही तरी विशेष आहे. भाकरी करता करता ती लगबगीनं उठली. त्याच्या हातातली पिशवी तिनं काढून बाजूला ठेवली. पटकन त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला आणि चहाचं आधण ठेवलं.


'काय आज खुशीत?' तिच्या प्रश्नावर त्यानं हसऱ्या चेहऱ्यानं 'हूं' म्हणत उत्तर दिलं.


तिनं बिनकानाच्या कपात चहा ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला.


त्यानं चहाचा एक घोट घेतला... आता त्याला राहवेना. शंभराची नोट तिला दाखवूयाच म्हणत त्यानं खिशात हात घातला आणि शॉक बसल्यासारखा झटका त्याने हाताला दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पार काळवंडला. चहाची चव एकदम कडवट झाली. तो तीन तीनदा फाटलेला खिसा तपासू लागला. खिसा फाटलाय हे विसरून त्याच खिशात शंभराची नोट आपण ठेवली हे त्याच्या आता लक्षात आलं. अंगावरच्या कपड्याला जेवढे म्हणून खिसे होते ते त्याने तपासले. कपडे काढून झाडले; पण ती नोट काही सापडायला तयार नव्हती.


'अहो, काय झालं? असं काय करताय? आनंदात घरात आला आणि आता एकदम काय झालं...?' ती न समजून सारखं विचारत राहिली.


नोट नाही हे समजल्यानं तो सैरभैर झालेला. तिचे प्रश्न त्याला ऐकू येत होते; पण उत्तर द्यायला मनापर्यंत पोचतच नव्हते. 'माझी नोट पडली, माझी नोट पडली' एवढंच तो म्हणत राहिला. काही तरी वाटून तो उठला आणि घरातनं धावत सुटला. ज्या रस्त्यानं आला होता, त्या रस्त्याचा कोपरा न कोपरा शोधत निघाला. येणाऱ्या-जाणाऱ्याला न् विचारू लागला.... माझी नोट सापडली का? कुणी नोट पाहिली का? येताना काय काय स्वप्नं आपण बघितली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आता काही काही नाही. खीर नाही, चमचमीत जेवण नाही, पोराला चड्डी नाही, बायकोची चोळी नाही, लॉटरी नाही, घरात सण नाही... काही काही नाही... सगळा रस्ता त्यानं तीन तीनदा पाहिला. नोट सापडत नाही याची खात्री झाली. आणि तो डोक्याला हात लावून तिथंच बराच वेळ बसून राहिला, खचला. बऱ्याच वेळानंतर कधी तरी पाय ओढत

ओढत तो घरी

आला. उंबऱ्यातून आत जायचे त्राणच त्याच्यात उरले

नव्हते. तो दारातच बसून राहिला. काही क्षण शांततेत

गेले.


"आये, पप्पा आला!' म्हणत पोरगं येऊन पाठीवर

पडलं. एरवी फुलासारखं वाटणाऱ्या पोराला त्यानं

तिरीमिरीत झटकून टाकलं.


'आई गं!' म्हणून ते कळवळलं. 'असं काय

करताय!' म्हणत बायकोनं येऊन त्याला उचलून घेतलं.

त्यानं तिच्याकडे पण रागानं पाहिलं.


'बबल्या काय सांगतो ते तर ऐका.'


'हे बघ!' म्हणून बबल्यानं त्याच्या पुढं शंभराची

नोट नाचवली. तो उडालाच. हे कुठून आले? विचारत

त्यानं बबल्याकडून नोट हातात घेतली.


रडवेल्या चेहऱ्यानं बबल्या म्हणाला, "खेळत खेळत

बाजारात गेलोतो, येताना वाटेत गावली."


त्यानंतर बबल्या काय काय सांगत राहिला; पण

त्याला काही ऐकू आलं नाही. त्याच्या डोळ्यांतून

आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं बबल्याला छातीला

कवटाळून मटामट मुके घेतले. बायकोच्या पाठीवर

हात टाकला. आता त्यांचा सण झोकात साजरा होणार

होता!

No comments:

Post a Comment