Tuesday, September 27, 2022

महात्मा गांधी

                           



                             आज गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपिठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणारे गुरुजनवर्ग आणि माझ्या शालेय सवंगड्यांनो, आज मी गांधीजींच्या जीवनावर थोडे बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे, अशी माझी नम्र विनंती आहे.

    'महात्मा गांधी' म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक कर्तबगार आणि थोर नेते. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. २  ऑक्टोबर १८६९  हा त्यांचा जन्मदिवस. राजकोट संस्थानचे दिवाण असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण दिले.

          मित्रहो , त्यावेळच्या शिक्षणात मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले.ते बॅरीस्टर झाले आणि वकिली करू लागले.परदेशात वकिली करीत असतानाच काळे-गोरे हा जनमाणसातला भेदभाव त्यांना दिसून आला.रेल्वेच्या प्रवासात त्यांना भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे ,हे गोरे इंग्रज ठरवत असत.गोरे इंग्रज वर्णाने काळे असलेल्या लोकांवर अन्याय ,अत्याचार करत असत ,त्यांना गुलामासारखे वागवत असत.याच अनुभवाने प्रेरित होऊन महात्मा गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा दृढनिश्चय केला; पण त्यांनी इंग्रज राजवटीशी लढाई करण्यासाठी जो मार्ग निवडला तो म्हणजे अहिंसेचा .

        जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेल्या नेत्यांना आपल्यात सामील करत त्यांनी इंग्रजाविरुद्धची फळी बळकट केली.भारतातील गरिबी ,उच्च नीच भेदभाव ,अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी योग्य ती पावले उचलली .अन्न ,वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजाही काही भारतीय लोकांना पुरेशा नव्हत्या .मित्रहो ,जनतेचे हे हाल गांधीजींना पहावले नाहीत.त्यांचे हळवे  हृदय  देशप्रेमाने आणि देशबांधवांच्या प्रेमाने गहिवरून आले.त्यांनी जनतेला अन्न,वस्त्र ,निवारा पुरेसा मिळावा म्हणून कार्य करण्याचे ठरवत स्वतःच्या भरजरी कपड्यांचा त्याग केला आणि सुटाबुटातील वकिली पेशातील गांधीजीनी फक्त पंचा नेसून अंगावर उपरणे घेत वावरू लागले.जणू त्यांनी शपथ घेतली होती .... मायभूमीला स्वातंत्र्याचे वस्त्र परिधान करण्याचे!

           एवढेच करून ते थांबले नाहीत.त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने छेडली ,अनेक सत्याग्रह केले.इंग्रजांच्या जुलमी कारभाराचा त्यांनी निषेध केला.इंग्रजांच्या जाचक धोरणांना विरोध केला.त्यांच्या साध्या राहणीमानाला आणि  उच्च विचारांना भारून जनता त्यांना 'महात्मा', 'राष्ट्रपिता' 'बापूजी' म्हणू लागली.

त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेली जनता रस्त्यावर उतरली.ते भारताला स्वातंत्र्य मिळवून  देण्याच्या ,स्वातंत्र्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या जनसमुदायाच्या साथीने गांधीजीनी जुलमी इंग्रजांना हैराण केले.

    'भारत छोडो', 'सायमन गो बॅक'  अशी आंदोलने छेडली .वेळप्रसंगी गोऱ्यांचा लाठीमारही त्यांनी सहन केला.सर्वधर्मसमभाव हा जनतेमध्ये जागवत भारतीय जनता एकसंघ बनवण्यासाठी मोलाचे कार्य केले.

              १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.अनेक नेत्यांनी आपआपल्या मार्गांनी देशासाठी योगदान दिले.त्यात गांधीजींचा सिंहाचा वाटा होता,असे म्हटले तर चूक ठरणार नाही.शस्त्र न उचलताही लोकशाहीच्या मार्गाने सरकारला धारेवर धरता येते , हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.इंग्रज देश सोडून निघून गेले.देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी झाली.एकाच देशाचे दोन देश निर्माण झाले.काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी ,१९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली.ते काळाच्या पडद्याआड गेले.खरं 'महात्मा' म्हणजे महान आत्मा होते ते ! या महान नेत्यास त्रिवार अभिवादन ! 

जय हिंद, जय भारत !

No comments:

Post a Comment