Sunday, October 9, 2022

वाचनाचे महत्व Importance of Reading


                                                       




वाचनाचे महत्व Importance of Reading 


                                             रोज सकाळी वर्तमानपत्र घरात आले की,प्रथम आपणच वाचावे असे वाटते .जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालले आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते.आपल्याला वाचता आले नसते तर केवढ्या अघाध  ज्ञानाला आपण पारखे झालो असतो.वाचाल तर वाचाल हे डॉ.आंबेडकरांचे सुवचन किती सार्थ आहे .पण याचा नेमका अर्थ फक्त योग्य वाचन करणाऱ्यालाच उमगू शकतो.

                       फार पूर्वी एक पुस्तक विकत घेण्यासाठी जमिनीचा मोठा तुकडा द्यावा लागत असे. आज मात्र परिस्थिती पूर्ण बदललेली आहे.अगदी १५ ते २० रुपयानांही एखादे चांगले पुस्तक मिळते.चांगल्या पुस्तकाच्या वाचनातून मनावर चांगले संस्कार होत जातात,अनेक विषयांवर चांगले मार्गदर्शन मिळते.पण वाचनाची आवड आज कमी होताना दिसत आहे.लोकांची व्यस्त दिनचर्या ,24 तास प्रसारित होणारी करमणूक व आधुनिक सुख-सुविधा यांमुळे वाचनाची गोडी कमी झाली आहे.

                            ग्रंथांना गुरूंचे स्थान देण्यात आले असून आपल्याकडे सर्व ज्ञान राखून न ठेवता ते वाचकाला देतात.जगाच्या विविध भागांतील संशोधकांची चरित्रे आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की ही माणसे जाती ,धर्म ,देश ,भाषा ,चालीरीती या सर्व बाबतींत पूर्णपणे भिन्न होती.पण त्यांचा वाचनाचा व्यासंग हे एक वैशिष्ट्य समान होते.वाचनामुळे माणसाचे जीवन बदलून त्याला एक नवीन दिशा मिळू शकते.

                     तसेच वाचनानंतर मनन -चिंतन करून त्या ज्ञानाचे प्रत्यक्षात आचरण करणारी माणसे संपूर्ण जगाचा आधारस्तंभ बनतात.उत्तम व्यावसायिक ज्याला बनायचे असते त्यांच्यासाठी त्या विषयातले अथांग ज्ञान देऊ करणारी साप्ताहिके अल्प किंमतीत बाजारात उपलब्ध असतात.अनेक लोक नको तिथे गरज नसतानाही वायफळ पैसे घालवतील पण २५ रुपयांचे एखादे चांगले पुस्तक विकत घेणार नाहीत .काही पुस्तके ही क्षणांची सोबती तर असतात तर काही आयुष्यभराची .

              वाचनाच्या छंदामुळे माणसाचे व्यक्तिमत्वही संपन्न होते.ज्या वक्त्यांचे वाचन भरपूर असते त्यांचे भाषण श्रवणीय व माननीय ठरते.कथा,कादंबऱ्या,नाटके,काव्य यांच्या वाचनाने मनोरंजन तर होतेच ,शिवाय मनाला  प्रसन्नता लाभते .शेक्सपिअरची नाटके आजही जगभर मोठ्या आवडीने वाचली जातात.निवेदक

,लेखक,मुलाखतकार ,वक्ते , अभ्यासक तसेच विचारवंत आणि इतर अनेकांना जर वाचनाची साथ असेल  तर त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रभावीपणा व माधुर्य दिसून येते.

               वाचनाने माणूस चिंतनशील बनतो.आजकाल टेलिव्हिजनवरील मनोरंजन कार्यक्रम,मालिका,चित्रपट इ.चा प्रसार झाल्यामुळे माणसांची वाचनाची सवय खूपच कमी झाली आहे.दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम माणूस एकामागोमाग पाहतच जातो आणि वाचन पूर्णपणे विसरून जातो.याउलट एखादे चांगले पुस्तक वाचले तर ते आपल्याला विचारप्रवृत्त करते.आणि आपण योग्य पुस्तकाच्या वाचनाची गोडी लावली तर काही दिवसांतच तुमच्या आयुष्याला एक नवे वळण लागेल.म्हणूनच म्हणतो ....

वाचाल तर नक्की घडाल. 

No comments:

Post a Comment