छत्रपति शिवाजी महाराजांना स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी दाखवलं,राज्य हे नुसतंच शब्दांवरती घडत नाही तर त्याला कणखर मनगटाची व कृतीची आवश्यकता असते,हे ज्यांनी आपल्या अमोल वाणीतून छत्रपतींना सूचित केलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ.
जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते.लखुजीराव जाधव हे एक मोठे वतनदार प्रस्थ होते.जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.हा विवाह दौलताबाद या ठिकाणी पर पडला.शहाजीराजे यांना पुणे,सुपे,चाकण, इंदापूर येथील जहागिरी मिळाली होती.१६२५ ते १६२८ या कालखंडात विजापूरचे सरदार म्हणून शहाजीराजे कार्यरत होते.
१९ फेब्रुवारी १६३० ला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवबाचा जन्म झाला.त्याचे पालनपोषण मोठ्या लाडाने व संस्काराने जिजाऊंनी केले.शिवरायांची जडण-घडण करताना मासाहेब जिजाऊंनी गुरुस्थानी राहून शिवरायांना युद्धकला ,मल्लविद्या,गनिमी कावा यांचे सखोल ज्ञान दिले व यातून शिवरायांची जडण-घडण केली.
आपल्या मुलाने 'हिंदवी स्वराज्य' निर्माण करावे,वंचीतांना न्याय द्यावा,मराठ्यांचा छत्रपति व्हावा ही जिजाऊंची इच्छा होती.यासाठी जिजाऊंनी शिवरायांना प्रेरित केले,प्रोत्साहन दिले,मावळ्यांच्या संघटनासाठी छत्रपतींना उपदेश केले.
"शिवबा ,स्वराज्य निर्माण करायचं असेल तर विस्कटलेल्या मावळ्यांना एका छताखाली आणलं पाहिजे तरच स्वराज्याची निर्मिती होऊ शकते." हे विचार शिवरायांना राजमाता जिजाऊंनी दिले.
शिवरायांचा विवाह १६ मे १६४० रोजी सईबाईंशी घडवून आणला.तोरणागड जिंकण्यासाठी प्रेरणा दिली.ज्यावेळी छत्रपति संकटात होते त्यावेळी त्यांना अचूक मार्गदर्शन करणाऱ्या जिजाऊ इतिहासात पाहावयास मिळतात.रयतेचा राजा झाला पाहिजे यासाठी राज्याभिषेकासाठी शिवरायांना प्रेरणा दिली आणि शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा म्हणून शिवराय सर्वसामान्यांच्यासाठी समोर उभे राहिले.
शहाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेत गेले असता २३ जानेवारी १६६४ रोजी निधन झाले.तत्कालीन परिस्थितीत पतिनिधनानंतर सती जाण्याची प्रथा होती पण शिवाजीराजांच्या आग्रहामुळे व दूरदृष्टिकोनामुळे जिजाऊ सती गेल्या नाहीत, तर शहाजीराजांच्या स्मृतीला स्मरून त्यांच्या स्वप्नातील 'स्वराज्य निर्मितीचं' स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले व एक नवा विज्ञानवाद तत्कालीन समाजव्यवस्थेसमोर ठेवून नवा इतिहास घडवला.
अशा या आदर्श मातेचा मृत्यू १७ जून १६७४ रोजी झाला .३५० वर्षानंतरही एक आदर्श माता म्हणून सर्वसामान्यांच्या मुखामध्ये सन्मानाने,आदराने ,राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव घेतले जाते.
No comments:
Post a Comment