Tuesday, December 20, 2022

स्वच्छतेचा महामंत्र देणारे आधुनिक संत संत गाडगेबाबा




 नमस्कार मित्रांनो,

आज आपण 'संत गाडगेबाबा ' यांचे जीवनकार्य व शिकवण पाहुयात.

अध्यक्ष महाशय माननीय.... सर, प्रमुख उपस्थित दर्शविणारे माननीय... सर. सदैव विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि सुसंस्कृत घडविण्यासाठी झटणारे आमचे गुरुजनवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो.

आज मी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर भाषण करणार आहे आणि ते आपण शांतपणे ऐकाल यात तीळमात्रही शंका नाही. संत गाडगेबाबा म्हणजे एक थोर समाजसुधारक! संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात झाला.

   १८७६ मध्ये जन्मलेल्या गाडगेमहाराजांनी आपले आयुष्य लोकसेवेसाठीच घालवले. त्यांचे बालपणीचे नाव होते डेबू . डेबूच्या वडीलांचे डेबू लहान असतानाच निधन झाले. पित्याचे छत्र हरपले. घरात भयंकर दारिद्रय. अशा अवस्थेत डेबू मामाकडे राहू लागला. घरची व शेतीची कामे करू लागला. डेबू सगळी कामे मन लावून करीत होता; पण अचानक एके दिवशी म्हणजे १९०५ मध्ये आपल्या तरुणपणात डेबू मामाचे घर सोडून निघून गेला. तो पुन्हा कधी घरी परतला नाही. 'हे विश्वची माझे घर' असे म्हणत डेबूने वाट फुटेल तिकडे आपला प्रवास सुरू केला. अंगात फाटकी कपडे, दाढी वाढलेली, हातात एखादी काठी अशा अवस्थेत गावोगावी फिरत राहिला. एखाद्या गावात जाऊन दिवसभर गावातले रस्ते, चौक झाडून साफ करायचा: कुणाची लाकडे तोडून द्यायची. कुणी भाकरी-कालवण दिले तर तेच खाऊन पोटाची खळगी भरायची, असा दिनक्रम सुरू झाला, साफसफाई करताना कुणी विचारले तर सांगायचा, की “आज गावात संध्याकाळी कीर्तन आहे."

देवळाच्या पाटावर सगळे लोक जमा व्हायचे; पण त्यांना कुणी बुवा दिसायचे नाहीत. मग सारा गाव जमा झाला , की संत गाडगेबाबा स्वतःच हातात खापरं घेऊन कीर्तनाला सुरुवात करायचे. 'गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला. 'आपल्या सुमधुर आवाजात ते कीर्तनात लोकांनी सामील करून घ्यायचे. समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा आणि स्वच्छता या विषयांवर गाडगेबाबा कीर्तन करीत असत.गावातील लोक त्यांची वाणी ऐकून आणि प्रबोधनात्मक भाष्य ऐकून एकदम तल्लीन होऊन जात. लोकांच्या, उद्धारासाठी अंधश्रद्धेवर फटकारे ओढत त्यांनी लोकांना स्वच्छतेचंही महत्त्व पटवून दिलं. स्वतःच हातात झाडू घेऊन त्यांनी गावंच्या गावं स्वच्छ केली. त्याचबरोबर लोकांची मनेदेखील स्वच्छ केली.

संत गाडगेबाबाचे कार्य चालूच होते. आज या गावात, तर उद्या त्या गावात. त्यांचे कीर्तन ऐकून मोठे-धनाढ्य लोक त्यांच्या चरणाशी नतमस्तक होत. अनेकांनी त्यांना पैसे देऊ केले; पण त्यांनी एका पैशालाही हात न लावता गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरा, असा सल्ला दिला. याच दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने बाबांनी अनेक धर्मशाळा उभ्या केल्या. रोगी-महारोगी यांच्यासाठी दवाखाने, अस्पृश्यांसाठी वसतिगृहे, कन्या शाळा अशी विधायक कामेही संत गाडगेबाबांनी केली.

मित्रांनो, संत गाडगेबाबा बुद्धिवादी व समाजहित बघणारे आधुनिक संत होते. त्यांनी समाजाला कानमंत्र दिला, तो म्हणजे असा, की खोटेपणाने वागू नका, फुकटचे खाऊ नका, व्यसनापासून दूर रहा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा बाळगू नका आणि. मुलांना शिक्षण द्या. स्वतः वैराग्याचे रूप घेऊन संबंध मानवजातीला चांगुलपणाची शिकवण देणारा असा संत विरळच. संत गाडगेबाबांना त्रिवार अभिवादन. एवढे बोलून मी थांबतो.

जय हिंद, जय भारत !

No comments:

Post a Comment