Tuesday, December 27, 2022

युगपुरुष : स्वामी विवेकानंद मराठी भाषण /निबंध




युगपुरुष : स्वामी विवेकानंद मराठी भाषण / निबंध 

"ज्ञानवंत तू ! कीर्तीवंत तू ! आढळ तुझे स्थान!

तुझ्या पूजनी विनीत होणे,हाच आमचा सन्मान!"

   ज्यांच्या विचारातून अनेक युगायुगांसाठी प्रकाश निर्माण होत राहील,असे स्वामी विवेकानंद हे थोर युगपुरुष होते.

       विवेकानंदांचा जन्म विश्वनाथ दत्त व भुवनेश्वर देवी या दाम्पत्याच्या पोटी 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता शहरात झाला. शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचार मंथन चालू असतानाच त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच विवेकानंदांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले.

         रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे पवित्र कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. कार्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी भारतभर भ्रमण केले. त्या भ्रमंतीत त्यांना मातृभूमीच्या समस्यांची जाणीव झाली. त्या सोडवण्यासाठी योजनात्मक विचार त्यांनी मांडले.

       1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या 'जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये' स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या 'माझ्या बंधू आणि भगिनींनो!' या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्यांच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांच्या अमोघ वक्तृत्ववाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले.

      पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देऊन 1897 साली ते भारतात परतले. इंग्लंड मधून निघताना एका इंग्रज मित्राने त्यांना एक प्रश्न केला. विलासाची लीला भूमी असलेली पाश्चात्यभूमी सोडल्यावर चार वर्षांनी आपली मातृभूमी आपणाला कशी वाटेल?त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, "पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी फक्त भारतभूमीवर प्रेम करत होतो. पण आता भारतातील धुळीचे कण व तेथील हवा देखील मला पावित्र्याने भारलेली वाटेल. कारण आता भारत हा माझ्यासाठी तीर्थ होऊन बसला आहे."

      जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाचा दैदिप्यमान पुतळा असलेल्या या महान युगपुरुषाच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे राहिले. अवघ्या चाळीस वर्षांच्या मर्यादित आयुष्यात अमर्यादित अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला.

        स्वामीजींच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्येचकीत झाले.त्यांच्या अढळ तपस्वीतेतून समाजमनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले.त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या.

अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन!





No comments:

Post a Comment