Thursday, December 22, 2022

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी भाषण





अध्यक्ष महाशय,

मला भाषण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मॅडम......उपस्थित प्रेक्षक,गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 मी आज छत्रपती शिवरायांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाबाई यांच्या विषयी चार शब्द बोलणार आहे.

 इसवीसन 1600  साल आठवले की आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास.पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास त्याहूनही भयानक होता. तब्बल तीनशे ते साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात होता.खरंतर आज आपण खूप सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहे.

 जरा विचार करून बघा. समजा वीज नसती, रस्ते नसते,फोन, मोटारी नसत्या,वर्तमानपत्र नसती, नुसती कल्पना केली तरी आपल्याला ती सहन होणार नाही. पण त्याकाळी हे काही नसताना माणसं जगत होती.

   सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती राबत होती, झगडत होती,अन्याय आणि अत्याचाराशी परकीय शत्रूंनी आक्रमण केलेल्या भयानकाळी राती इथे थैमान घालत होत्या. अशातच एक मायमाऊली वाट बघत होती या अंधाराला भेदून सर्वदूर महाराष्ट्रात प्रकाशाचे किरण पसरून आनंदाची वीज चमकणाऱ्या तेजस्वी सूर्याची. शत्रूच्या हुकूमशाहीने आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या रयतेला सुखी समृद्ध करण्यासाठी. एक भोळी आस लावून ती माय एका प्रखर तेजोमय किरणासाठी आतुरली होती.ती कणखर, निर्भय आणि आशावादी माय म्हणजेच मासाहेब जिजाऊ .

   19 फेब्रुवारी 1630 मध्ये या माय माऊलीच्या पोटी एक तेजस्वी, तेजाळता सूर्य जन्माला आला. त्याच्या तेजाने महाराष्ट्र उजळून निघाला.शिवबाच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी. शिवबाचा चरण स्पर्श घेण्यासाठी वसुंधरा आसुसली होती. त्यांच्या हरहर महादेव गर्जनेने सह्याद्रीचा ऊर अभिमानाने भरून आला होता.

  रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा,परकीयांच्या अन्याय, अत्याचाराला महाराष्ट्रातून जमीनदोस्त करणारा ध्येयवादी महापराक्रमी राजा आई जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. पण शिवराय असे आपोआपच घडले नाहीत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ साहेब. त्यांची तपस्या त्यांनी झेललेल्या हालपिष्ठा पती महिनो महिने लढाईवर असताना त्यांनी बाल शिवबाचा  सांभाळ केला.

 अहो नुसता सांभाळच केला नाही तर त्यांच्या अनेक गोष्टी पारखत असत. अनेक पराक्रमी महापुरुषांचे चरित्र सांगत त्यांच्या अंगात बळ निर्माण केलं.मन घट्ट बनवलं. शरीर दणकट निगरगट्ट बनवलं.आपली रयत अंधारात आहे.तिच्यावर होणारा अत्याचार, निरपराध लोकांचे जाणारे बळी या सर्व गोष्टींची जिजाऊंनी शिवबाला जाणीव करून दिली आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झुंजायला शिकवलं. म्हणूनच आई जिजाऊ थोर आहेत.आजच्या भाषेत सांगायचं तर ग्रेट आहेत.

 आजच्या माता बघितल्या तर आपल्याला कळून येईल, मुलाला थोडं खरचटलं तरी त्याला खूप खूप जपतात. पण त्या जिजाऊने राजपुत्र म्हणून त्याला राजवाड्यात जपून ठेवला नाही. तर सामान्य जनतेत मिसळायला शिकवलं.त्यांची सुखदुःख वाटून घ्यायला शिकवलं.म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.खरंच धन्य त्या जिजाऊ साहेब!एवढे बोलून मी थांबतो.


 जय हिंद!जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment