Tuesday, December 27, 2022

स्वामी विवेकानंद मराठी भाषण Swami Vivekanand Marathi Speech





 स्वामी विवेकानंद मराठी भाषण

 'माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो'असे उद्गार काढून विश्वबंधुतेचे नाते प्रस्थापित करणारे एक थोर भारतीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विषयी आज विचार मांडतोय.

    स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला. त्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी व वडिलांचे नाव विश्वनाथबाबू असे होते .कोलकाता शहरातील सिमोलीया भागात मकर संक्रांतीच्या पवित्र सणादिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते तर आई भुवनेश्वर देवी हुशार बुद्धिमान व धार्मिक वृत्तीच्या होत्या. अशा मातापित्यांनी नरेंद्र यांना सुसंस्काराचे धडे दिले. ते सर्व प्रकारच्या खेळात तल्लख होते.त्यांची स्मरणशक्ती अजब होती.त्यामुळे ते अभ्यासात हुशार होते.त्यांच्या मनात नेहमी सद्भावना वास करीत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत घातले. लहानपणापासून नरेंद्र यांना उत्तम एकाग्रतेची देणगी लाभली होती. त्यामुळे ते कोणताही विषय आत्मसात करीत होते. शालेय अभ्यासात हुशार असल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी आपले नाव दाखल केले. त्यांना सर्वच विषयांमध्ये गोडी होती. ते वाचनालयात जाऊन विविध विषयांचे सखोल वाचन करत असत. त्यांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचे सर्व ग्रंथ वाचून काढले.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अधिक चिकित्सक बनली.

   नोव्हेंबर 1880 मध्ये नरेंद्रची ओळख दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंशांशी झाली. त्यांना नरेंद्र यांचे विषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण झाली. ते नरेंद्र यांचे गुरु बनले. त्याचबरोबर परमहंस आणि योग मार्गाचा आपला वसा विवेकानंद यांच्याकडे सोपवला आणि कार्यास प्रारंभ करण्यास सांगितले.

      नरेंद्र यांनी हिंदू धर्म व तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला.1893 मध्ये त्यांना अमेरिकेतील शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेची माहिती कळाली. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी नरेंद्र आगबोटीने अमेरिकेला रवाना झाले. सर्व प्रकारे तयारी दर्शवून त्यांनी या परिषदेला जाण्याचा आग्रह दर्शविला आणि या परिषदेत जाण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांनी संन्यासाचा स्वीकार अंगीकारला व स्वामी विवेकानंद नाव धारण केले. 31 मे 1893 रोजी शिकागोस गेले. त्या ठिकाणी आलेले जगभरातील नानाधर्मीय लोक स्वामी विवेकानंदांना पाहून प्रभावित झाले आणि याच ठिकाणी त्यांनी 'माझ्या बंधू भगिनींनो' असे उद्गार काढून उपस्थित रसिक श्रोत्यांची मनी जिंकली. त्यांच्या हृदयाची पकड घट्ट केली. त्यांचा संदेश हा नवजीवनाचा संदेश होता.व्याख्याने देत आणि पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देत ते अमेरिकेत बरेच महिने राहिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एका धर्माचा दुसऱ्या धर्माशी झगडा असू शकत नाही, सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे, क्रांती घडवायची आहे, स्नेहबंध निर्माण करणारे उद्गार त्यांनी काढले तसेच त्यांनी या परिषदेमध्ये ओघवत्या भाषेत हिंदू धर्माची श्रेष्ठता सर्वांना पटवून दिली.

        त्यांच्या भाषणामुळे स्वामी विवेकानंद यांची ओळख सर्वांनाच झाली. कोणतीही व्यक्ती त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने बोलू शकत होती. एकदा अशीच एक अमेरिकन महिला त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर संभाषण करू लागली. बोलता-बोलता विवेकानंद यांना तिने उगीचच खोदून विचारले, " स्वामीजी तुमच्या अंगावरचे कपडे भारतीय असूनही पायातील बूट मात्र परदेशी बनावटीचा आहे हा फरक कसा हो? " स्वामीजींना प्रश्न कळाला होता.त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पिकले.त्यांनी उत्तर दिले, " मी एक संन्याशी.लोकांनी जे प्रेमाने दिले ते मी घेतले. त्यात माझे तुझे असा भेदभाव नाही.मी जोपर्यंत या देशात आहे, त्याचा मी तोपर्यंत आदर्श स्वीकार करेन मात्र येथून निघून जाताना ते येथेच ठेवून जाईन!" बाई अधिक थिजल्या. एवढ्या मोठ्या माणसाला अशा एका क्षुल्लक प्रश्नाच्या मुद्द्यावरून कात्रीत धरण्याचा आपला प्रश्न मूर्खपणाचा होता,याची जाणीव झाल्याने ती क्षणभर नाराज झाली.

      अमेरिकेतील कार्य असे चालू राहील, अशी व्यवस्था करून स्वामीजी इंग्लंडला आले.त्याही ठिकाणी व्याख्याने दिली. इंग्लंडमध्येही त्यांना अनेक सहकारी मिळाले. आपल्या परदेशातील वास्तव्यात स्वामी विवेकानंदांनी आपल्या धर्म,संस्कृतीची पताका पाश्चिमात्य देशात फडकावून हिंदू धर्माचे उज्वल दर्शन घडविले.1896 च्या अखेर स्वामी विवेकानंद भारतात परतले. परदेशातील समृद्धी व सुबत्ता पाहून भारतातील गरिबी व हालाखी अधिक जाणवली.  1897 रोजी त्यांनी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून समाजाच्या उद्धारासाठी एक सेवासेना उभारण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते. हा विचार बैठकीमध्ये मांडला आणि तो सर्वांना मान्य झाला आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये बंधुभाव उत्पन्न व्हावा यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा या मिशनने खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेतली.राष्ट्राची उभारणी करण्याचे कार्य या मिशनने हाती घेतले.

      राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी धरून कार्य करीत असताना स्वामी विवेकानंदांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांना दम्यासारख्या विकाराने पछाडले.अशा परिस्थितीत ही त्यांचे राष्ट्र उभारणीचे व समाज प्रबोधनाच्या विचारांचा प्रसार व प्रचार अखंडपणे चालूच होता. अशा परिस्थितीतच ते पुन्हा 1899 साली परदेशाच्या प्रवासाला निघाले आणि न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्याचबरोबर कॅलिफोर्नियात शांती आश्रमाची स्थापना केली.पॅरिसमधील भरलेल्या धर्म उत्क्रांती परिषदेस ही उपस्थित राहिले आणि ते पुन्हा भारतात परतले आणि याच प्रवासात त्यांना दम्याच्या विकाराबरोबर मधुमेहाचा विकार जडला. मात्र त्यांचे राष्ट्र उभारणीचे कार्य युद्धपातळीवर सुरूच होते. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी लवकर उठून तीन तास ध्यान केले.काही तास आश्रमवासीयांशी विविध विषयांवर चर्चा केली.नंतर शांतपणे योग मार्गाने त्यांनी देह विसर्जन केले.अवघे 39 वर्षे आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभले. मात्र अल्पावधीत त्यांनी केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे.म्हणून मी राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. धन्यवाद!







No comments:

Post a Comment