Tuesday, January 10, 2023

प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे संस्कार कथा




 संस्कार कथा

 प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे 

              महात्मा बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी गावोगावी जात असत. एके दिवशी ते एका गावात गेले. तेथील बहुतेक सर्वच लोक भांडखोर आणि व्यसनी होते. तेथे जागोजागी दारूचे आणि जुगाराचे अड्डे होते. बुद्धांनी त्या गावात जाऊन लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " बंधूंनो वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. त्याने काहीही साध्य होत नाही. एखादा  दुष्टपणाने वागत असेल तरी तुम्ही त्याच्याशी दुष्टपणा करू नका. कारण चिखलाने  चिखल धुतला  जात नाही. जो तुमच्याशी वाईट वागतो,त्याचेही तुम्ही भले करा. जशास तसे न वागता त्याचाही आदर करा. तेव्हाच तो मनुष्य सुधारू शकेल. "

    लोकांमध्ये बसलेला एक गुंड प्रवृत्तीचा मनुष्य बुद्धांचे भाषण ऐकत होता.त्यांचे बोलणे संपतात तो तावातवाने बोलू लागला, "अरे पाखंड्या, तू येथे कशासाठी आला आहेस? तुझी व्यर्थ बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही."  तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले, " तुला आणखी काही सांगायचे आहे काय? "  तेव्हा उत्तरादाखल तो अधम त्यांच्यावर थुंकला. पण बुद्ध शांतच राहिले. त्यांनी वस्त्राने आपला चेहरा पुसला व पुन्हा म्हणाले, "  तुला आणखी काही सांगायचे आहे काय? " तेव्हा तो मनुष्य म्हणाला, " तू ढोंगी, मतलबी, कावेबाज आणि खोटारडा आहेस. " तेवढ्यात दुसरा मनुष्य उभा राहिला आणि त्वेषाने म्हणाला,  " लोकांनो पाहता काय? याला मारा.हा महात्मा बुद्धांना अपशब्द बोलत आहे."

   तेव्हा महात्मा बुद्धांनी त्याला शांत केले व म्हणाले, "तू याच्यावर रागावू नकोस.कोणी आपल्याला शिवी जरी दिली तरी आपण प्रत्युत्तर देऊ नये."  नंतर ते त्या गुंडाला उद्देशून म्हणाले, "मी तुझे म्हणणे  ऐकले. आता मलाही काही सांगायचे आहे. समज तुझ्याकडे एक भाकरी आहे आणि तुला ती मला द्यायची आहे.पण मी ती घेतलीच नाही तर ती कोणाकडे राहील? " तो मनुष्य म्हणाला,"त्यात काय विशेष? ती माझ्याकडेच राहील. बुद्ध म्हणाले, " बरोबर बोललास!आतापर्यंत तू मला जेवढ्या शिव्या दिल्यास,त्या मी घेतल्याच नाहीत.म्हणून त्या तुझ्याकडेच राहिल्या आहेत. " ते ऐकून तो मनुष्य सर्दच झाला.

 दुसऱ्या दिवशी तो मनुष्य महात्मा बुद्धांना भेटण्यासाठी दुसऱ्या गावी गेला व त्यांचे पाय धरून म्हणाला, " हे महात्मन,काल मी आपला अपमान केला. त्याबद्दल मला क्षमा करा.आपण थोर आहात. " तेव्हा बुद्ध म्हणाले, "अरे अजून तू कालचा विचार करीत आहेस?  विसरून जा ते सगळे.

'प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे'  हाच खरा धर्म आहे.




No comments:

Post a Comment