मकर संक्रांत
या सणाविषयी मराठी निबंध / मराठी माहिती
'तिळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणून एकमेकांच्यातील भांडण, कटूता विसरण्याचा सण म्हणजे,मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, तो सण म्हणजे 'मकर संक्रांत'. इंग्रजी वर्षाप्रमाणे जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. याच महिन्यात येणारा हा सण. सूर्य या दिवशी मकरवृत्तात प्रवेश करतो. म्हणून या सणाला 'मकर संक्रांत' हे नाव पडले. आर्यांच्या काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जात आहे.
प्रत्येक सणामागे काही ना काही पौराणिक कथा असतातच. तशीच या सणाबाबतही कथा सांगितली जाते. संक्रांती नावाची देवी होती. तिने या दिवशी शंकासुराचा वध केला.ही देवी लांब ओठ, मोठे नाक,नऊ हात असलेली. ही देवी प्रसन्न नाही की, मंगलदायक नाही. तिचे वाहन, वस्त्र व अलंकार वेगवेगळे असतात.या वस्त्र व अलंकारांच्या माध्यमातून ती पुढे येणारे संकट सुचवत असते.ती ज्या दिशेने येते त्या ठिकाणी समृद्धी येते आणि ती जिकडे जाते तिकडे संकट कोसळते. यावरून 'संकट येणे' या अर्थाने 'संक्रांत येणे' हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.
या सणानिमित्त तिळगुळ देण्याची पद्धत आहे. काळी वस्त्रे घालण्याची प्रथा आहे. यामागे विज्ञान दडलेले आहे.हा सण येतो थंडीच्या दिवसात.त्यामुळे शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते.म्हणून तिळगुळ खाण्याची पद्धत आहे.काळे वस्त्र थंडीपासून रक्षण करते म्हणून काळे वस्त्र शुभ मानले आहे.
या सणाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती जपत असतो. सुवासिनी सुगडात बोरे, हरभरा,ऊस,गहू घालून वाणवसा करतात. हळदीकुंकू समारंभ साजरा करून काहीतरी वस्तू भेट देतात.लहान मुलांचे बोरनहान करतात. या साऱ्या निमित्ताने लोक एकत्र येतात.
दक्षिण भारतात या सणाला 'पोंगल' म्हणतात.आपण संक्रातीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' म्हणतो. त्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी, लेकुरवाळी भाजी, कढी,मुगाच्या डाळीची खिचडी असा मस्त बेत करतो. संक्रातीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. हा दिवस अशुभ मानतात.
तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी खूप विचार करूनच या सर्व सणांची योजना केली आहे. म्हणून सण साजरा करताना जाणून घ्या आपल्या सणांचे महत्त्व.
No comments:
Post a Comment