Sunday, January 15, 2023

'माझी आई 'मराठी भाषण / निबंध





"स्वामी तिन्ही जगाचा,

आईविना भिकारी"

       सुवासिकता,सुंदरता आणि सु कोमलता या गुणांनी गुलाबाला मनोवेधकता प्राप्त होते.ध्रुवाची निश्चलता, निर्धारितता आणि नेत्रदीपकता त्याला अढळ स्थान मिळवून देत असते. गंगेचे पावित्र्य, परंपरा व परोपकारिता तिच्या पदरी पुण्याई बांधीत असते. आईचेही अगदी तसेच आहे.

 "आई तुझी माया आभाळाएवढी, तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी."

 आईविना मन छिन्न आहे, जीवन सुन्न आहे आणि गजांत लक्ष्मी असलेले वैभव देखील शून्य आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात... "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी".

 आई एक विद्यापीठ आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे या जन्मदेपुढे कनिष्ठ आहेत.म्हणून तर जगतज्जेत्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. कुणापुढेही न वाकलेला,न झुकलेला व जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असणारा सिकंदर आई पुढे नतमस्तक झाला होता. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराजांच्या जीवनात आईला सर्वश्रेष्ठ स्थान आहे.

 आई मुलाला जन्म देते.सर्वस्वी परावलंबी असणाऱ्या बाळाला नयनांचा दिवा आणि हाताचा पाळणा करून वाढवते. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. चार घर हिंडून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण सुद्धा स्वतः उपाशी राहते व आपल्या लेकराला ओला-कोरडा घास भरवते. आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावते,हे आपल्याला इतिहासातील हिरकणीने दाखवून दिले आहे. कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून निर्जीव मूर्ती घडवतो. पण आई मात्र जिवंत गोळ्याला आकार देऊन त्याच्या कोऱ्या पाठीसारख्या संवेदनशील मनावर सुसंस्कार करते.म्हणूनच महात्मा गांधीजी म्हणत की,'एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.' आईचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच असतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव नसतो. मातेच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणी नसतात.आईच्या महतीचे वर्णन इंद्रदेवही करू शकत नाही.

 "शब्द शोधण्यास निरोप स्वर्गात धाडले,

नाही सापडत म्हणून देवेंद्रानेही कर जोडले."

 मातेमुळे आपणास विश्वाचे दर्शन घडते.तिच्याशिवाय या जगात माझे, आपले म्हणावे असे कोणीच नाही.आईचे हृदय सागरासारखे विशाल असते. आपल्या चिमण्या पाखरांसाठी ती अपार कष्ट घेते आणि आपल्या बाळांच्या मधून एक संस्कारक्षम पिढी निर्माण करते.

      जगाच्या पाठीवर एकच न्यायाचे महान मंदिर आहे ते म्हणजे आई. जेथे मुलाचे सर्व दुर्गुण माफ होतात. म्हणूनच 'आई' या दोन अक्षरी शब्दाने संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. आईसारखे दुसरे दैवत नाही. म्हणून कुंतीपुत्र कर्णाला राधेने आपलेसे केले.देवकी पुत्र श्रीकृष्णाला यशोदेने ममता दिली व आपल्या देवत्वाची प्रचिती आणून दिली.

 आई खरंच काय असते याचे यथार्थ वर्णन करताना कवी फ. मु. शिंदे म्हणतात...

 "आई खरंच काय असते?

 लेकराची माय असते,

 वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

 लंगड्याचा पाय असते.

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही अन उरत ही नाही.

 शेवटी मी एवढेच म्हणेन....

 "रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचे नातं महान असतं.

म्हणून आई या शब्दापुढे सारं जग लहान असतं!"

धन्यवाद!




No comments:

Post a Comment