Monday, January 2, 2023

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj apratim bhashan






 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

  श्रीपती, भूपती,नृपती,अधिपती, पृथ्वीपती, छत्रपती, कुलवंत, जयवंत,यशवंत,किर्तीवंत, धैर्यशील, सतशील, धर्मशील, प्रजादक्ष, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती  शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा!

   नमस्कार, व्यासपीठावरील मान्यवर,व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो! माझ्या भाषणाचा विषय लक्षात आला असेल. विषय मांडतोय 'युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज'.

 'झाले बहु, होतील बहु,

 परंतु यासम हा!'

 हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडते, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज.आणि म्हणूनच रसिकहो... शेकडो वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान आढळ आहे. छत्रपती शिवाजी राजांचे 'राजा आणि व्यक्ती' म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चरित्र अत्युच्च होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कालशिलावर अखंड आहेत.म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात'

 "निश्चयाचा महामेरू

 बहुत जनासी आधारू

 अखंड स्थितीचा निर्धारू

 श्रीमंत योगी

धीर उदार सुंदर

 शूर प्रियसी तत्पर

सावधपणे नृपवर

तुच्छ केले

यशवंत किर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत  पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा

     शिवाजी महाराजांना हे जाणतेपण लाभले ते त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यामुळेच.

    शिवरायांचा जन्म 1630 मध्ये झाला 1680 साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे 50 वर्षांचे आयुष्य. पण या अल्पकाळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे.या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या कर्तृत्वात आणि महान चारित्र्यात दडलेले आहे.

    शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले व मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी या सुपुत्राचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊंनी या आपल्या असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिपक्व केले. शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे व पिता शहाजीराजे हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला.

    महाराजांना मराठा तितुका मिळवून महाराष्ट्र धर्म वाढवायचा होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती.हिंदूंच्या सार्वभौम स्वराज्याची अपेक्षा केली आणि '  हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे! '  या विचाराने प्रेरित होऊन हिंदवी राज्याच्या स्थापनेचा पाया त्यांनी घातला. हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ जाणतेपण.

 शिवाजी राजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजविण्यास प्रारंभ केला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली आणि या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले. पण राजांनी कधी माघार घेतली नाही. आदिलशाही निजाम यांच्याबरोबर काही वेळेला स्वकीयांचाही विरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांचे नाव ऐकताच शत्रूच्या गोटात भंबेरी उठत असे.

" या भूमंडळीच्या ठायी

धर्मरक्षी ऐसी नाही

महाराष्ट्र धर्म उरला नाही

 तुम्हाकरिता " 

 या समर्थ रामदास स्वामींच्या वचनात महाराजांच्या पराक्रमाची, अवतार कार्याची माहिती आहे. म्हणूनच अनेक इतिहासकारांनी देखील महाराजांची तुलना अलेक्झांडर, सिझर, नेपोलियन अशा जगप्रसिद्ध सेनानींशी केली आहे. पण महाराज नुसतेच सेनानी नव्हते ते थोर मुत्सद्दी होते. राजकारणाचे रबर तुटेपर्यंत ताणायचे नसते, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच जयसिंगाचे सामर्थ्य लक्षात येताच महाराजांनी माघार घेतली. पण स्वराज्यातील बारा किल्ले व एक लाख होनाचा मुलुख स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले. खरा यशस्वी कोण तर, जो विजयाचे फलित अधिकाधिक पदरात पाडून घेतो तो व वेळप्रसंगी चार पावले मागे सरतो आणि संधी मिळताच दहा पावले पुढे टाकतो. पराभवात ही आपल्या राज्याचे नुकसान कमीत कमी कसे होईल?  हे पाहतो तो खरा मुत्सद्दी.

   शिवाजी राजे यांचा राजकारणातील जरब पहाल तर आश्चर्याने थक्क व्हाल. आरमारातील दौलतखान व दर्यासारंग यांनी हयगय केल्याचे लक्षात येताच महाराज कठोरपणे लिहितात, " असे नादान थोडे असतील,ऐवज न पाठवून तुम्ही आरमार खोळंबून पाडाल,

एवढी हरामखोरी तुम्ही कराल

 न कळेल तरी ऐसे चाकर आज ठीक केले पाहिजे.

नेमून दिलेल्या कामात कामचुकारपणा करणारा मग तो ब्राह्मण जरी असला तरी महाराज रोखठोकपणे विचारतात, " ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो!"

    स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्याचे हात तोडणारे राजे एकटेच. लाच खाऊन ही जिने जगविता? थू तुमच्या जिनगाणीला!  असे प्रत्यक्ष मामाला उद्देशून म्हणणारे व प्रसंगी त्यांना कैद करणारे देखील महाराज एकटेच. ब्रिटिशांच्या सारखी महासत्ता देखील त्यांच्यापुढे नतमस्तक झालेली दिसते असे.  महाराज म्हणजेच राजे शिवछत्रपती होय.

 महाराजांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातेचा होता. म्हणूनच स्वकीयांची असो वा परकियांची असो. स्त्रीच्या शिलाचे रक्षण करणे व तिला मातेचे स्थान देणे राजे सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानतात. म्हणूनच सुभेदाराची सून लूट म्हणून समोर उभी असताना...

 " अशीच आमुची आई असती,

 सुंदर,रूपवती,

 आम्हीही सुंदर झालो असतो!

 वदले छत्रपती!"

 अशा नीतिमान युगपुरुषासमोर शतदा नतमस्तक व्हावे.

   रयत म्हणजे आपली प्रजा. हिचा सांभाळ पुत्रवत केला पाहिजे. हीच तळमळ महाराजांच्या ठाई होती. झुंडशाही नष्ट करून राजांनी अशी शिस्त लावली की लुटीतील एखादा सुतळीचा तोडा देखील लपवून ठेवण्याचे धाडस देखील कोण करत नसेल.जुन्या वतनदारांची वतने खालसा करून नवीन ही कोणास देऊ नयेत असे सक्त दंडक राजांनी घातले. सरंजामशाही नष्ट करून, गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात स्थान देऊन,आपले प्रशासन विलक्षण कार्यक्षम ठेवले.या थोर मानवाच्या जीवन चरित्राकडे पाहताना  एवढेच म्हणावेसे वाटते...

" गीतेचा संदेश तू!

आणि क्रांतीचा आदेश तू!

 संस्कृतीचा मान तू!

आणि आमचा अभिमान तू!

 जय हिंद ! जय शिवराय!






No comments:

Post a Comment