Sunday, July 30, 2023

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध

 


मराठी निबंध

माझा आवडता महिना श्रावण

 ऋतुच्या चक्रांनी निसर्ग आपली विविध रूपे या सृष्टीला दाखवीत असतो. सृष्टीवर विविध बदल होणे हा कालचक्राचा नियम आहे. या कालचक्रात बारा महिन्यांचे नानाविध रंग आपणास दिसून येतात. चैत्रात वृक्षांना पालवी फुटते आणि त्या नव्या बदलाची लोकांना मोहिनी पडते, कुणाला वैशाख वनवा आवडतो कुणाला मेघ शाम आषाढ हवाहवासा वाटतो तर कोणी सोनेरी अश्विनसाठी झुरतात.

        मला मात्र हिरव्या रंगाच्या विविध छटा उधळणारा श्रावण मासच आवडतो. किती ते रंग,! कधी दाट हिरव्या रंगात रंगलेली छटा तर कधी हिरवी ते कधी पोपटी हिरव्या रंगाची सृष्टी, जिला बघून बालकवी म्हणतात,

 श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे

 क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे l

      खरंच ऊन पावसाचा हा पाठ शिवनीचा खेळ नाचरे मोर कोणाला बरे आवडणार नाहीत? आणि यावर कळस म्हणजे आकाशात सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य. ज्याला बघून कुसुमाग्रज म्हणतात,

 हसरा नाचरा

 जरासा लाजरा

सुंदर साजरा

 श्रावण आला l

 श्रावणात माणसांनाच काय पण पशुपक्ष्यांना पाना फुलांना एका नव्या हर्षाने मोहित केलेले असते. शेतातील वाऱ्यावर डोलणारी पिके पाहून शेतकरी आनंदाने नव्या भविष्यांची स्वप्न पाहत आपल्या सुखमय जीवनाची कल्पना रचताना त्या भगवान शंकराची मनोभावे पूजा करतो. श्रावणात विविध धार्मिक प्रथा पाळल्या जातात. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराचे महत्त्व वेगळे मग तो सोमवार महादेवाचे आराधना करून तर मंगळवारी मंगळागौरीची पूजा मांडतात. एकीकडे निसर्ग आपले सौंदर्य बरसवत असतो. आपली कोळी बांधव श्रावणात निसर्गाचा आदर राखत प्रचंड लाटांनी खवळलेल्या सागराला नारळी पौर्णिमेला नारळ वाहून शांत करतात. बहिण भावाला राखीच्या पवित्र बंधनाने बांधून आजन्म आपल्या रक्षणाची ओवाळणी मागते, नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते.

      असा हा आनंदाची चौफेर उधळण करणारा बारा मासातील पाचवा मास श्रावण मास प्रत्येकाच्या आयुष्यात नव्या सुख स्वप्नांची नांदी घेऊन येतो. अवघी सृष्टीचे रूपच बदलून टाकतो. ज्याला पाहून नव्या उमेदीने आणि चैतन्याने उभे राहण्याची स्फूर्ती मिळते. प्रत्येक जीवाला दिलासा मिळत असतो. सर्वसृष्टी सुंदर हिरव्या गालीच्याने नटलेली दिसते, म्हणून मला हा श्रावण महिना खूप आवडतो.

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

-------------------------------------

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

-------------------------------------

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा यांसाठी उपयुक्त माहिती. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

           शब्द एकच मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ असणे ही एक भाषेतील गंमतच म्हणावी लागेल. खालील शब्द व त्याचे भिन्न अर्थ समजून घ्या व वाक्यरचनेनुसार शब्दांचे योग्य अर्थ लावा.

-------------------------------------

 शब्द  - वेगवेगळे अर्थ

-------------------------------------

अनंत - अमर्याद,परमेश्वर

अभंग-  न भंगलेला,काव्यरचनेचा एक प्रकार

आस - इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

अक्षर - पूर्ण उच्चाराचा वर्ण, अविनाशी

अंग - शरीर,भाग,बाजू.

कर - हात,किरण,एक क्रियापद

कसर - सूट,कमीपणा,एक किडा

कोळी - मासे पकडणारा,जाळे विणणारा किडा

काळ - मृत्यू, वेळ

कर्ण - कान, महाभारतातील योद्धा,त्रिकोणातील काटकोना समोरील बाजू

काप - तुकडा, कंप

खडा - उभा, लहानसा दगड

खोड  - मस्ती,झाडाचा बुंधा

गुण  - चांगल्या सवयी, दोरी

घाट - नदीवर बांधलेल्या पायऱ्या, डोंगरातील रस्ता

चिरंजीव - मुलगा,दीर्घायुषी

जलद - ढग,त्वरेने

जीव  - प्राणी,प्राण

तीर - नदीचा काठ, बाण

अंतर - लांबी,मन,भेद

ओढा - मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ

अर्थ - पैसा,आशय

अंक - मांडी,आकडा(संख्या)

अंबर - आकाश,वस्त्र

काच - जाच,पारदर्शक पदार्थ

काम - इच्छा, कर्तव्य

कोरडा - सुका,चाबकाचा फटकारा

कळ - भांडणाचे कारण, गुप्त किल्ली, वेदना

खोड - सवय, झाडाचा बुंधा

खल - दुष्ट , कुटण्याचे  साधन

गदा - संकट, शस्त्र

गंध - वास,कपाळावरील टिळा

चपला - वीज, वाहाणा

जीवन -  आयुष्य,पाणी

जागा -  ठिकाण,जागृत

डाव -  कारस्थान,कपट,खेळी

तळी-  तलाव,ताम्हण

तट - कडा,किनारा,किल्ल्याची भिंत

दल - पाकळी, संघटना 

ध्यान - मनन,चिंतन, भोळसट व्यक्ती

नाव  - होडी,कशाचेही नाव

पात्र - भांडे, नदीचे पात्र, नाटकातील पात्र

पार - झाडाच्या भोवतालची जागा, पलीकडे

पत्र - चिठ्ठी,पान

पक्ष - भाग,श्राद्ध,बाजू,राजकीय संघटना

पट - वस्त्र, कुस्तीतला एक डाव

भेट - भेटणे,नजराणा

माया - धन,ममता

मान - शरीराचा एक भाग, मोठेपणा

वर - श्रेष्ठ,पती,आशीर्वाद

वाणी -  वाचा, व्यापारी

वल्ली - स्वच्छंदी,व्यक्ती,वेल

वाली - वानराचे नाव,रक्षणकर्ता

शिळा - जुना, मोठा दगड

सूत्र - दोरी,धोरण

सूत - धागा, सारथी

किताब - पदवी,पुस्तक

हवा - वारा,पाहिजे

द्विज - पक्षी,ब्राह्मण

दंड - शरीराचा भाग,शिक्षा, काठी

धड - अखंड, माने खालील शरीराचा भाग

नाद-  छंद,आवाज

पूर - पाण्याचा पूर, नगर

नाग - सापाची जात,हत्ती

पय - पाणी, दूध

पर - परका,पीस, परंतु

भाव - भक्ती,किंमत,भावना

माळ - फुलांची माळ,ओसाड  जमीन 

मात्रा - उपाय, औषध, गोळी

माठ - पाण्याचे भांडे,एक प्रकारची भाजी

 वजन-  तराजूचे वजन,वचक

 वात - वारा, दिव्यातील वात

 वारी - पाणी, यात्रा

 विभूती -  अंगारा, रक्षा, भस्म

 शृंग -  डोळे, शिंग, शिखर 

 सुमन -  पवित्र मन, फूल

 हार -  पराभव, फुलांचा हार

 कोट - किल्ला,अंगरखा

-------------------------------------

             धन्यवाद !

-------------------------------------


Wednesday, July 5, 2023

शिष्यवृत्ती परीक्षेच्या रकमेत वाढ आजचा शासन निर्णय



उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये करण्याबाबत... वाढ

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक:-- प्रमाशि- २०२०/प्र.क्र.३१/ एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

संदर्भ :-

दिनांक :- ०३ जुलै २०२३१)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसजी/१३५३. दि.२.०४.१९५४ २) शासन निर्णय क्रमांक एससीएच-१०९५ (८४/९५)/माशि -८, दि. २.८.१९९५

३) शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००५/१३९/०५)/केपयो, दि. १४.०२.२००७

४) शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००९/ (९०/०९)/केपुयो, दि. २२.७.२०१०


(५) शासन निर्णय क्रमांक एफईडी- ४०१४/६४३/प्र.क्र. ४ / एसडी-५, दि. २९.६.२०१५ ६) शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र. ४ / एसडी-५, दि. १५.११.२०१६ ७) शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.२२.०४.२०२०

रोजीचे पत्र क्रमांक शिसमा / इ. ५ वी व इ. ८ वी / शिसंच.ए-४/१३८१

प्रस्तावना :-

राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहीत करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मुळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरीता अधिकाधिक प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने दि. २.४.१९५४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. २. शालेय शिक्षण विभागाच्या दि.०२.०८.१९९५ रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्च प्राथमिक करीता ३९५४ व माध्यमिक करीता ३८१४ संच मंजुर होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १४.०२.२००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या दरामध्ये व संचामध्ये वाढ करून, उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे ७९०८ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे ७६२८ इतके संच मंजूर करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या दरामध्ये व संचामध्ये वाढ करण्यात आली आहे.

उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे १६६८३ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६२५८ संच मंजूर करण्यात आले आहेत.

३. सद्यस्थितीत एते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती करीता १६६८३ संच मंजुर असून यांकरीता संचनिहाय किमान रु. २५०/- प्रतिवर्ष ते कमाल रू. १०००/- प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते. तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६२५८ संच मंजुर असून यांकरीता संचनिहाय किमान रु. ३००/- ते कमाल रू. १५००/- प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते.

४. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्षाकरीता व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून २ वर्षाकरीता शिष्यवृत्ती देण्यात येते. तथापि, विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने तसेच सदर शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये गेल्या १३ वर्षांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


१. "उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करून ती उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५ वी) सर्व संचांकरीता रु. ५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु. ५०००/- प्रतिवर्ष) व माध्यमिक शाळा (इयत्ता ८ वी) सर्व संचाकरीता रू. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु. ७५००/- प्रतिवर्ष इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. शिष्यवृत्तीचे सुधारीत दर सन २०२३-२४ पासून लागू राहातील.

३. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयाचे सहपत्र ई व एफ मध्ये नमूद संच एच (H) व संच आय ) करीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात येत आहे.

५. सदर योजनेकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यास तसेच लेखाधिकारी (लेखा), शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ६. या बाबींवर होणारा खर्च त्या त्या शिष्यवृत्त्यांखाली दर्शविण्यात आलेल्या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०१)

माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या (०१) (०१) ग्रामीण भागातील प्रज्ञावंत

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती (२२०२०३४२).


२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या (०३) शिष्यवृत्त्या, (०३) (०२) प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सहाय्य (२२०२०३८९). २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०२) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (उच्च माध्यमिक शाळा ) (२२०२२३१८) 间

शासन निर्णय क्रमांक: प्रमाशि- २०२० / प्र.क्र.३१/ एसडी-५


iv) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०१) माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या (०१) (०२) खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती. (पुर्व माध्यमिक शाळा) (२२०२०३५१)


19. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दि. १३ जून २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या


मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७०३१७०७०६२६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Saturday, July 1, 2023

गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण

 गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर भाषण






             माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो,आज आपण "गुरुपौर्णिमा " साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत .त्याविषयी मी तुम्हाला काही दोन शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे,अशी मी नम्र विनंती करतो.

 " गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,

 गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः! "

      ' आषाढ शुद्ध पौर्णिमा'  हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. हाच दिवस "व्यासपौर्णिमा " म्हणूनही ओळखला जातो.कारण याच दिवशी 'व्यास ऋषींनी'  महाभारताचे लेखन केले होते.पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु ज्ञान देतात.ते ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. म्हणून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

             माणूस हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो. कारण माणसाजवळ विद्या आहे.ही विद्या देण्याचे काम गुरुच करतात. आपला पहिला गुरु म्हणजे आपले आईवडील.आणि दुसरा गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतात,हीच भूमिका शिक्षक शाळेत पार पाडतात. गुरु शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात.

        आईच्या शब्दाप्रमाणे 'गुरु ' या शब्दालाही मर्यादा नाहीत. गुरु शिवाय तरणोपाय नाही. ज्याप्रमाणे सागराच्या गलबताला योग्य दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र हवे.ते नसेल तर गलबत भरकटेल.तसेच या मायावी जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवास योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरु हवाच नाहीतर माणूस भरकटेल. त्याचा जन्म वाया जाईल.

        संत ज्ञानेश्वर,संत कबीर यांसारख्या थोर संतांनीही आपल्या कर्तृत्वाचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे.वाल्मिकींचा आदर्शवाद, व्यासांचा व्यवहारवाद द्रोणाचार्य यांची कर्तव्यनिष्ठा आजही गौरवली जाते.

         छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु त्यांच्या आई  जिजाऊ,सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर,लता मंगेशकर यांचे गुरु दिनानाथ मंगेशकर अशी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आजही पाहायला मिळते.

       भारतीय संस्कृतीत गुरूला अतिशय महत्त्व दिले आहे गुरु म्हणजे निष्ठा,

गुरु म्हणजे श्रद्धा,

गुरु म्हणजे भक्ती, 

गुरु म्हणजे विश्वास,

गुरु म्हणजे वात्सल्य,

गुरु म्हणजे आदर्श,

गुरु म्हणजे अमर्याद ज्ञान.

हेच ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच गुरुऋण फेडण्याचा मार्ग आहे.

            आज पर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन!

 एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो

 धन्यवाद!




*पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा *
संख्याज्ञान :
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
देवनागरी संख्याचिन्हे
रोमन संख्याचिन्हे
संपूर्ण स्पष्टीकरणासहित