मराठी निबंध
माझा आवडता महिना श्रावण
ऋतुच्या चक्रांनी निसर्ग आपली विविध रूपे या सृष्टीला दाखवीत असतो. सृष्टीवर विविध बदल होणे हा कालचक्राचा नियम आहे. या कालचक्रात बारा महिन्यांचे नानाविध रंग आपणास दिसून येतात. चैत्रात वृक्षांना पालवी फुटते आणि त्या नव्या बदलाची लोकांना मोहिनी पडते, कुणाला वैशाख वनवा आवडतो कुणाला मेघ शाम आषाढ हवाहवासा वाटतो तर कोणी सोनेरी अश्विनसाठी झुरतात.
मला मात्र हिरव्या रंगाच्या विविध छटा उधळणारा श्रावण मासच आवडतो. किती ते रंग,! कधी दाट हिरव्या रंगात रंगलेली छटा तर कधी हिरवी ते कधी पोपटी हिरव्या रंगाची सृष्टी, जिला बघून बालकवी म्हणतात,
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे l
खरंच ऊन पावसाचा हा पाठ शिवनीचा खेळ नाचरे मोर कोणाला बरे आवडणार नाहीत? आणि यावर कळस म्हणजे आकाशात सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य. ज्याला बघून कुसुमाग्रज म्हणतात,
हसरा नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजरा
श्रावण आला l
श्रावणात माणसांनाच काय पण पशुपक्ष्यांना पाना फुलांना एका नव्या हर्षाने मोहित केलेले असते. शेतातील वाऱ्यावर डोलणारी पिके पाहून शेतकरी आनंदाने नव्या भविष्यांची स्वप्न पाहत आपल्या सुखमय जीवनाची कल्पना रचताना त्या भगवान शंकराची मनोभावे पूजा करतो. श्रावणात विविध धार्मिक प्रथा पाळल्या जातात. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराचे महत्त्व वेगळे मग तो सोमवार महादेवाचे आराधना करून तर मंगळवारी मंगळागौरीची पूजा मांडतात. एकीकडे निसर्ग आपले सौंदर्य बरसवत असतो. आपली कोळी बांधव श्रावणात निसर्गाचा आदर राखत प्रचंड लाटांनी खवळलेल्या सागराला नारळी पौर्णिमेला नारळ वाहून शांत करतात. बहिण भावाला राखीच्या पवित्र बंधनाने बांधून आजन्म आपल्या रक्षणाची ओवाळणी मागते, नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते.
असा हा आनंदाची चौफेर उधळण करणारा बारा मासातील पाचवा मास श्रावण मास प्रत्येकाच्या आयुष्यात नव्या सुख स्वप्नांची नांदी घेऊन येतो. अवघी सृष्टीचे रूपच बदलून टाकतो. ज्याला पाहून नव्या उमेदीने आणि चैतन्याने उभे राहण्याची स्फूर्ती मिळते. प्रत्येक जीवाला दिलासा मिळत असतो. सर्वसृष्टी सुंदर हिरव्या गालीच्याने नटलेली दिसते, म्हणून मला हा श्रावण महिना खूप आवडतो.
No comments:
Post a Comment