आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज आपल्या देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्र्यातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्षे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकारकांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्यांच्या संघर्षांचा आपल्याला विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो.
या शुभ दिनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करतात. ही गाणी ऐकून देशभक्ती आणि राष्ट्र प्रेमाच्या भावनेने आपले हृदय भरून येते. सरकारी कार्यालयांमध्ये हा दिवस सुट्टीचा असतो परंतु तरीही सर्वच कर्मचारी आणि अधिकारी देशाच्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्रित येतात.
आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत. केशरी रंग ,त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो. याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोक चक्र सुद्धा आहे, ज्यात 24 आरे असतात. स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज शासकीय आणि प्रशासकीय अशा सर्वच ठीक ठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो.
याशिवाय विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना प्रबोधन करण्यासाठी भाषणे व माहिती देतात.
देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ती आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे.
स्वातंत्र्यदिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ येथे मोठा उत्सव असतो. जिथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. तसेच राष्ट्रगीतासह 21 तोफा डागून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीही करण्यात येते. सर्व सेना स्वतंत्र दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपल्या महान भारत देशाला वंदन करतात.
आपला भारत महान का आहे? पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत म्हणून ? की आपल्या देशात सामाजिक समस्या, गरिबी, निरक्षरता,दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे ? तर नाही! आपला देश महान आहे कारण "वसुधैव कुटुंबकम" अर्थात 'संपूर्ण जग एक कुटुंब आहे ' अशी संस्कृती असणारा आपला देश आहे. " सर्वे भवन्तु सुखी नहा सर्वे संतु निरामया " ही आपल्या देशाची शिकवण आहे
. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एकमेव देश आहे. एक तो दिवस होता जेव्हा 1963 मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकलीवर आणण्यात आले होते आणि आज तीच 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ' म्हणजेच 'इस्रो ' जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थांपैकी एक आहे.
नुकतेच भारताने चंद्रयान मोहीम फत्ते केलेली आहे.
"There is no country more diverse than India. " रंगांचा देश- जिथे रोज एक नवीन सण असतो.आपली कला,संस्कृती,सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की 5000 वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होत्या. ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू,शून्य संख्याप्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन आणि सर्व कलांसोबतच अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य विज्ञान,अभियांत्रिकी,गणित,शेती व्यवसाय,वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विज्ञानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे.
विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत. भारतातील सुवर्ण मंदिर जगभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी जात, धर्म, वर्ग, वय या गोष्टी न बघता दररोज जवळपास एक लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते. असा देश जिथे जगातील सर्वाधिक अशा तीन लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत. कुंभमेळ्यात एका वेळी पंधरा कोटींपेक्षा जास्त भक्त असतात. भारतात मनाला शांती देणारे बुद्धांचे विचार आहेत. अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कुठेच नसेल.
जगातले 75 टक्के वाघ भारतात आहे. त्याचबरोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या लहानशा तीरावर बनवलेला जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात मोठी शाळा, सर्वात उंच क्रिकेटचे मैदान, तरंगते पोस्ट कार्यालय, जगातील सर्वात स्वस्त चार चाकी, जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल, जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारताची शोभा वाढवत आहेत. भारतात जेवढे लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात तेवढी तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे. जगभरात जेवढे सोने आहे त्यातले 11 टक्के भारतीय महिलांकडे आहे. जगात सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात आहेत. सर्वांना आपल्या देशात त्यांचा हक्क मिळतात. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक देश भारत जिथे जगातील 25% डाळींचे उत्पादन केले जाते. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत.
मायक्रोप्रोसेसर, पेंटियम चीफ,ऑप्टिक फायबर,रेडिओ वायरलेस, कम्युनिकेशन तसेच जगातील सर्वात लहान सॅटेलाइट भारताने बनवली आहे
या सर्व गोष्टी त्या देशाची देन आहेत,जिथे जात, धर्म,भाषा, बोली वेगवेगळे आहे.तरीही आहे सर्वांचा सन्मान. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्तान. जगातील सर्वात जलद सुपरसोनिक मिसाईल ब्रह्मोस आणि न्यूक्लिअर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या एक लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही, तो इतिहास आहे भारत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते. त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाहीत तर सीमेवर राहतात, ज्यांना आपण जवान म्हणतो. जे 53 अंश सेल्सिअस थंडीत आणि 52 अंश सेल्सिअस गरमीत ही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणांचे बलिदान देतात. ते जवान हे सैनिक आहेत भारत. असा देश जिथे देशाला देव नाही तर माता- भारतमाता म्हटले जाते.
अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी, सीता रघुतमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे
जय हिंद!भारत माता की जय!